Breaking News

इंग्लंड दौर्‍यासाठी पृथ्वीला मिळणार संधी?

शुबमन गिल दुखापतग्रस्त

लंडन ः वृत्तसंस्था
श्रीलंका दौर्‍यावर गेलेला पृथ्वी शॉ लवकरच इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या विराट कोहली अ‍ॅण्ड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि ही मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, पण या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल याला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये क्षेत्ररक्षण करताना शुबमनला ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून सावरण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. अशात विराट अ‍ॅण्ड कंपनी सलामीला पर्याय म्हणून पृथ्वी शॉ याला श्रीलंका दौर्‍यावरून इंग्लंडला बोलवण्याची शक्यता बळावली आहे. एका वृत्तानुसार इंग्लंड दौर्‍यावर असलेली भारतीय टीम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तशी विनंती करणार आहे.  
संघात राखीव सलामीवीर म्हणून मयांक अग्रवाल आणि अभिमन्यू इश्वरन हे दोन खेळाडू आहेत. मयांकने 2018 ते 2019 या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. दुसरीकडे इश्वरनकडे 64 प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव आहे, पण इंग्लंडचा दौरा प्रदीर्घ चालणार असल्याने पृथ्वी शॉला बोलावण्याचा विचार सुरू झाला आहे.

Check Also

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …

Leave a Reply