मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपये किमतीची संपत्ती जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच पत्नी आरती देशमुख आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये वरळीतील एक कोटी 54 लाख रुपयांचा फ्लॅट आणि दोन कोटी 67 लाख रुपये किमतीची रायगडच्या उरण तालुक्यातील धुतूम यथील जमीन आहे. देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या मदतीने मुंबईतील बारचालकांकडून अवैधरीत्या चार कोटी 70 लाख रुपये जमा केले तसेच दिल्लीतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून चार कोटी 18 लाख रुपये जमवले असून ते श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्टमध्ये आल्याचे भासवले, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे तसेच देशमुख यांची पत्नी आणि मुलालादेखील अशाच प्रकारचे समन्स बजावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. दरम्यान, ईडीची ताजी कारवाई म्हणजे राजकीय सुडाचा आरोप करणार्यांना चपराक आहे, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे.
ही तर सुरुवात आहे. माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज चार कोटी जप्त झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटकही करेल.
-किरीट सोमय्या, भाजप नेते