Breaking News

दहावीचा निकाल 99.95 टक्के; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली, तर एकूण निकालात कोकणाने 100 टक्के यश संपादन करून अव्वल स्थान पटकाविले आहे. या वर्षी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे. निकालात गेल्या वर्षीपेक्षा चार टक्के वाढ झाली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 99.96 टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 टक्के आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02 टक्क्यांनी जास्त आहे. यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील नऊ लाख नऊ हजार 931 मुले, तर सात लाख 78 हजार 693 मुली असे एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली. इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात, परंतु यंदा अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर 20 टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. राज्यातील 22 हजार 767 शाळांमधून 16 लाख 58 हजार 164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी सहा लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, सहा लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, दोन लाख 18 हजार 70 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, यंदाच्या परीक्षेत 99.5 टक्के उत्तीर्ण झाले, तर उरलेले 0.05 टक्के अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेे आहेत. वर्षभरात काही विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असेच फक्त अनुत्तीर्ण आहेत. एकूण 1400 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात 368 एटीकेटीचे विद्यार्थी आणि 916 पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. 

आकडे दृष्टिक्षेपात

मुलींचा निकाल         99.96 टक्के

मुलांचा निकाल         99.94 टक्के

957 विद्यार्थ्यांना      100 टक्के गुण

27 विषयांचा निकाल    100 टक्के

758 विद्यार्थी नापास

128 पुनपरीक्षार्थी नापास

4,922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

विभागनिहाय टक्केवारी

कोकण     100

अमरावती   99.98

मुंबई 99.96

पुणे 99.96

औरंगाबाद   99.96

नाशिक     99.96

लातूर      99.96

कोल्हापूर   99.92

नागपूर     99.84

वेबसाइट झाल्या क्रॅश

इयत्ता दहावीचा निकाल दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी ऑनलाइन पाहू शकणार होते, मात्र निकालाच्या साइट क्रॅश झाल्या. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले होते. अखेर दोन्ही अधिकृत वेबसाइट तब्बल साडेसहा तासांनी चालू झाल्या, मात्र तरीही निकाल डाऊनलोड करणे अवघड होत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक अस्वस्थ दिसून आले.

ठाकरे सरकार हँग झाले आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली तर नवल काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसत आहे.

-अतुल भातखळकर, भाजप आमदार 

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply