पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; शिहू विभागातील पूरग्रस्तांची घेतली भेट
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील पूरग्रस्तांची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) भेट घेतली. शासन आपल्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी पूरग्रस्तांना या वेळी दिला.
मुसळधार पावसाने पेण तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरले. यामुळे अनेक घरामंध्ये पाणी जाऊन अनेकांचे संसार विस्कळीत झाले आहेत. घरगुती सामानाबरोबरच भात व मत्स्यशेती, तसेच गणपती कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी शिहू, बेणसे, चोळे, जुई-अब्बास व गडब गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकर्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. पालकमंत्र्यांसोबत या दौर्यात माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, वैकुंठ पाटील, ललित पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, शिहूचे माजी सरपंच भास्कर म्हात्रे, बेणसेच्या माजी सरपंच नीता कुथे, उपाध्यक्ष यशवंत ठाकूर, संताजी शेळके, वसंत मोकल, वासुदेव म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.