मुरूड : प्रतिनिधी
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मुरुड तालुक्यातील श्री सदस्यांनी महाड तालुक्यामधील पुरग्रस्त गावांत स्वच्छता मोहीम राबवून तेथील मंदिरे, शाळा, आंगणवाड्या आणि ग्रामपंचायत कार्यालयांची साफसफाई केली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी व विश्वस्त सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड तालुक्यातील काशीद, मजगाव, आदाड, राजपुरी, आगरदांडा, टोकेखार येथील सुमारे 383 श्री सदस्यांनी महाड तालुक्यातील राजेवाडी, कोंडिवले, दादले, खरवली, कोल या पुरग्रस्त गावातील शाळा, आंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये तसेच मंदिरांमध्ये साठलेला सुमारे 27 ट्रक गाळ, चिखल व कचरा साफ केला. या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक श्री सदस्याने घरून स्वच्छतेसाठी लागणारी हत्यारे, जेवणाचा डबा, पाणी, मास्क, सॅनिटाईझर इत्यादी वस्तू सोबत आणल्या होत्या. कोरोनाविषयक सर्व नियम काटेकोरपणे पाळून हे सेवाकार्य केल्याचे श्री सदस्य सदानंद मुंबईकर यांनी सांगितले.