पाली : प्रतिनिधी
अतिवृष्टीने महाड, पोलादपूरसह विविध भागात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तेथील आपद्ग्रस्तांना प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या सुधागड शाखेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वापट करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक समन्वय समिती या संघटनेच्या समन्वय समितीने सर्व शिक्षकांना पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सुधागड तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच आंतरजिल्हा बदली होऊन गेलेल्या शिक्षकांनी अवघ्या दोन दिवसात सुमारे दीड लाख रुपयांचा निधी उभा केला. या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे महाड व पोलादपूर तालुक्यातील आसानपोई बौद्धवाडा, आसानपोई, लोहारमाळ, चरई, चरई भोईवाडी, पोलादपूर मोहल्ला, महाड राजेवाडी स्थलांतरीत मोहल्ला, महाड बाजारपेठ येथील पुरग्रस्तांना वाटप करण्यात आले.
संघटनेच्या समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे, तसेच क. रा. शिंदे, अनिल राणे, सतीश हुले, प्रशांत गुरव, कैलास म्हात्रे, किशोर पाटील, सचिन खारतोडे, दिपक दंत, सुनील भिलारे, जनार्दन भिलारे, रमाकांत शिंदे, राजेंद्र अंबिके, दिपक शिंदे, गुरुनाथ शेरमकर, राजू बांगारे, राजेश गायकवाड, बजरंग बेलोसे, आदिनाथ फुंदे यांनी या मदतकार्यासाठी पुढाकार घेतला होता. तर सेवानिवृत्त शिक्षक रमेश लखिमळे यांचे या कार्याला विशेष योगदान लाभले.
सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे शक्य झाले.
-अनिल राणे, सचिव, सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती