रामदास कदमांचा गंभीर आरोप
मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. तेच गद्दार असून रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी या वेळी केला.
कदम म्हणाले की, माझ्याविरोधात माध्यमांमधून उलटसुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजर्यामध्ये उभे केले आहे. म्हणूनच माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेनेच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही. त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र देऊन खुलासा केला होता. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती, मात्र अन्याय किती सहन करायचा यालादेखील मर्यादा असतात.
अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ते जिल्ह्यामध्ये येतात. बाकी संपूर्ण जिल्हा त्यांनी वार्यावर सोडून दिला आहे. परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, असा दावा कदम यांनी केला.
मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुले निर्णय घ्यायला मोकळी आहेत. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक म्हणून जगेन, असेही कदम यांनी या वेळी स्पष्ट केले.