विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून 20 ते 25 ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 31) दिली.
अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला. या पूराने तेथील नागरिकांचे संपूर्ण जीवन विस्कळीत केले आहे. जगण्यासाठी त्या मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्थांसह भारतीय जनता पक्षाच्या वतीने जीवनावश्यक साहित्यांची जमा करून ते पूरग्रस्तांना देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातून भाजपतर्फे पूरगस्तांना मदत साहित्याचे वाटप होत आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठीचे मदत साहित्य रवाना करण्यात आले. या प्रसंगी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, पूरग्रस्त भागासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीत काहीही कमी पडू देणार नाहीत. कृपाशंकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे मदत साहित्य पाठविले आहे. भांडी कुंडी, अन्न पदाथ, चटया, कपडे, पिण्याचे पाणी याबरोबरच सायकलीही पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौर्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्रीसुद्धा कोल्हापुरात होते. आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने आले होते. त्यांनी या भेटीवेळी पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करायला हव्यात यावर चर्चा झाल्याचे सांगितले.
तसेच मुख्यमंत्री लवकरच यासाठी बैठक बोलावणार असून आम्हीही त्यात सहभागी होऊ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.