Breaking News

कासाडी नदीत सोडलेल्या रसायनांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

नागरिकांना श्वसनाचा त्रास; तक्रारींकडे दुर्लक्ष

कळंबोली : रामप्रहर वृत्त

तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणी राज्य शासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पनवेलपासून जवळ तळोजा एमआयडीसी आहे. ही औद्योगिक वसाहत 907 हेक्टरवर विस्तारित झाली आहे. या परिसरात 900 कारखाने आहेत. यात 400 कारखाने रासायनिक आहेत. या कारखान्यांतून रसायनमिश्रित पाणी एमआयडीसीजवळून वाहणार्‍या कासाडी नदीत सोडण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नदी दूषित होत आहे.

कोरोनाच्या काळात कारखाने बंद असल्यामुळे पनवेल परिसरातील नद्या स्वच्छ झाल्या होत्या, परंतु अनलॉकमध्ये कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. स्वच्छ झालेली कासाडी नदी पुन्हा प्रदूषित होऊ लागली आहे. यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे परिसरातील रहिवाशांना कासाडी नदीतील दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येते, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने एमआयडीसीतील कारखानदारांना 15 कोटींचा दंड ठोठावला. ती रक्कम वसूलही करण्यात आली. कित्येक वेळा कारखानदारांची पाणीकपातही करण्यात आली होती. तरीदेखील रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply