एकदिवसीय क्रिकेट सामन्याची विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. एकूणच भारतीय संघाचा विचार केला, तर संघात अनुभवी खेळाडूंना प्रधान्य देण्यात आले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहमद शामी हे 2015 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळले आहेत. ज्याच्या निवडीचा सर्वांना धक्का बसला तो दिनेश कार्तिक 2007 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळाला आहे. 14 जणांच्या संघात 8 खेळाडूंना विश्वकरंडक स्पर्धेचा अनुभव आहे. निवड समितीने संघातील खेळाडूंची निवड करताना अनुभवाला पसंती दिली आहे. या अनुभवी खेळाडूंवरच भारताची मदार असेल.
14 जाणांच्या संघात दिल्लीचा यष्टीरक्षक ॠषभ पंत याला स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकचा संघात सामवेश करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकला अनुभव असल्यामुळे त्यांची संघात निवड करण्यात आली आहे, असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले. दिल्लीचा यष्टीरक्षक ॠषभ पंत हा सध्या चांगला फॉर्मात आहे. तो आक्रमक फलंदाजी करतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणार्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात त्याचा समावेश होईल, असे सर्वांनाच वाटत होते, परंतु निवड समितीने दिनेश कार्तिकची निवड केली. विश्वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत मुख्य यष्टीरक्षकाला पर्याय म्हणून एक यष्टीरक्षक न्यावाच लागतो. जर धोनी जखमी झाला तर त्याच्या जागी खेळविण्यासाठी अनुभवी खेळाडूचा पर्याय म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. कार्तिक अनुभवी यष्टीरक्षक आहे. मोठी खेळी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. वेळ पडल्यास आक्रमक फलंदाजी करून तो धावांची गती वाढवू शकतो. अनुभवी यष्टीरक्षक म्हणून कार्तिकशिवाय आजच्या घडीला तरी निवड समितीकडे दुसरा पर्याय नव्हाता. त्यामुळे कार्तिकची निवड योग्य आहे.
विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. इंग्लंडमधील वातावरणात चेंडू हवेत वळतो (स्विंग होतो) याचा विचार करून वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमरा याच्याकडे भन्नाट वेग आहे, तसेच तो चेंडू स्विंग देखील करतो. भूवनेश्वरकुमारकडे स्विंग आहे. मोहम्मद शमी चेंडू नियंत्रणात ठेवतो. या तीन जणांच्या साथीला अष्टपैलू हार्दिक पांड्याची उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीचा पर्याय भारताकडे आहे. त्यामुळे भारताचा वेगवान मारा चांगला आहे. युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज आहेत. केदार जाधाव उपयुक्त ऑफस्पिनर आहे. चहल व यादव यांच्यात भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवण्याची क्षमता आहे. हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. अनुभवी रवींद्र जडेजासारखा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज संघात आहे.
भारताकडे गोलंदाजीची चांगली फळी आहे. गोलंदाजीत चांगले पर्याय कर्णधार विराट कोहलीकडे असतील, परंतु फलंदाजीत मात्र काही समस्या राहणार आहेत. विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात चांगले फलंदाज आहेत. असे असले तरी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याचे उत्तर मिळालेले नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा झाल्यापासून भारताने मागील दोन वर्षात चौथ्या क्रमांकासाठी 11 खेळाडू खेळवले. तरीही विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य फलंदाज सापडू शकलेला नाही. के. एल. राहुल याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो सालमीचा फलंदाज आहे. विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकसाठी तो पर्याय नाही. राहुलच्या कामगिरीत सातत्य नाही. तो भारतातील खेळपट्ट्यांवर खेळू शकेल, परंतु इंग्लंडमधील वातावरणात तशीच कामगिरी करेल असे वाटत नाही. विजय शंकरची देखील तीच परिस्थिती आहे. केदार जाधव हा चौथ्या क्रमांकासाठी आणखी एक पर्याय आहे. जर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली हे तीन फलंदाज लवकर बाद झाले, तर अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार्या फलंदाजावर सर्व मदार राहणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी ज्याचा विचार केला जातोय त्याचा 11 जाणांमध्ये समावेश होईलच असे नाही. त्यामुळे या विश्वकरंडक स्पर्धेत चौथ्या क्रमांकाची फलंदाजी ही भारतासमोर मोठी समस्या असेल.
या स्पर्धेत फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर येणार्या फलंदाजाचे महत्त्व जास्त आहे. त्यासाठी हुकमी असा पर्याय आज तरी भारताकडे नाही. त्यामुळे रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी या चार अनुभवी फलंदाजांवरच भारतीय फलंदाजीची मदार राहणार आहे. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वरकुमार, मोहम्मद शमी यांना गोलंदाजीची बाजू सांभाळावी लागणार आहे. एकूणच विश्वकरंडक स्पर्धेत अनुभवी खेळाडूंवरच भारताची भिस्त असेल.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात