Breaking News

एक्स्प्रेस वेलगत वॉटर हार्वेस्टिंगचा प्रस्ताव ; कळंबोली भाजपच्या सूचनेचे ‘सीएमओ’कडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लगत घाट परिसरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा रेन वॉटर हार्वेस्टिंग करून संचय करावा, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव कळंबोली भाजपाकडून बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या या सूचनेचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी स्वागत केले. त्यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता हा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या  सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे त्वरित वर्ग केला. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपाचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्या या संकल्पनेची एक तासाच्या आत  शासकीय पातळीवर दखल

घेण्यात आली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा 91 किलोमीटरचा आहे. यामुळे दोन्ही महानगर जवळ आले आहेत. हा महामार्ग बोर घाटातून जात आहे. त्याचबरोबर अनेक डोंगरातून बोगदे करून द्रुतगती महामार्गाला वाट करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात द्रुतगती महामार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. विशेषतः खोपोली खंडाळा, लोणावळा आणि काही प्रमाणात मावळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. डोंगर माथ्यावरून  हे पाणी  वाहत येऊन ते वाया जाते. महामार्गावर पावसाचे पाणी आल्याने  लेनची ही काही प्रमाणात दुरवस्था होते. एकंदरीतच पावसाचे प्रमाण जास्त असतानाही त्याचा काहीच फायदा होत नाही. रस्ते विकास महामंडळाने आयआरबीच्या माध्यमातून दुभाजकांवर  वेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्या झाडांना पावसाळ्याव्यतिरिक्त इतरवेळी टँकरने पाणी घालावे लागते. याकरीता मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि वेळही वाया जातो. इतर ठिकाणाहून पाणी आणून ही झाडे जगवावी लागतात. या पार्श्वभूमीवर कळंबोली भाजपाकडून महामार्गालगत पडणार्‍या पावसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाणी साठवण्याचा प्रस्ताव तयार

करण्यात आला.  प्रशांत रणवरे यांच्यासह पक्षाचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी आपली ही संकल्पना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बुधवारी रणवरे यांनी द्रुतगती महामार्ग लगत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबतची सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे केल्या. त्यानुसार प्रधान सचिव अजोय मेहता यांनी एका तासाच्या आतमध्ये या सूचनेचे स्वागत करून आपण ती नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठवले असल्याचा अभिप्राय प्रशांत रणवरे यांना कळवला. त्यांनी यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवले. त्यांनी कळंबोलीच्या भाजप पदाधिकार्‍यांशी फोनद्वारे संपर्क साधून ही सुचना चांगली असल्याचे सांगितले. भविष्यात हा विभाग याविषयी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली. तसेच रणवरे यांची संकल्पना रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी समजावून घेतली.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply