Breaking News

करावे तसे भरावे

‘खातो नथी, खावा देतो नथी’ असा नरेंद्र मोदी यांचा जुनाच लौकिक होता, तो मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरही कायम राहिला. भ्रष्ट पुढार्‍यांकडे करड्या आवाजात खुलासा मागणारे कुणी तरी सत्तेवर आल्याचा आनंद भारतीय जनतेला मात्र झाला. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई आजही जोरात सुरू आहे. आणि त्याच्याच झळा महाराष्ट्रातील काही नेत्यांना लागत आहेत. मतांची बेगमी करून वर्षानुवर्षे राजकारण साधणार्‍या संधीसाधू नेत्यांना गेली कैक दशके भारतीय लोकशाहीमध्ये जणु अभय मिळाले होते. असे खुर्च्या उबवून मलई खाणारे नेते संख्येने कमी नाहीत. व्होटबँकेच्या जिवावर सत्तेचे लोणी खाणार्‍या पुढार्‍यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी उघडली आहे. 2014 साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ताबडतोब काळ्या पैशाच्याविरोधात केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली, ती अद्यापही सुरूच आहे. माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी बुधवारी भल्या सकाळी सक्तवसुली संचलनालयाचे अधिकारी येऊन थडकले. त्यांच्यासोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारी देखील होतेच. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल, पुणे अशा अनेक मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. साखर कारखान्यातील सुमारे 158 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दीड वर्षांपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते. त्यावेळीच अनेक कागदपत्रेदेखील त्यांनी ईडी आणि प्राप्तीकर विभागाच्या हवाली केली होती. तुरुंगाच्या दिशेने वाटचाल करणारे मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्षभराहून अधिक काळ तुरुंगाची हवा खाऊन आले. माजी मंत्री नवाब मलिक अजुनही गजाआडच आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांचाही नंबर लवकरच लागणार असे किरीट सोमय्या छातीठोकपणे सांगताना दिसतात. माजी गृहमंत्री देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत या दोघांची सध्या जामिनावर सुटका झालेली आहे. त्यांना जामीन बहाल करताना माननीय न्यायालयाने जामीन प्रक्रियेसंदर्भात तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले होते. तपासयंत्रणांच्या नियमबाह्य वर्तनाबद्दल निश्चितच टीका होऊ शकते, परंतु याचा अर्थ हे सारे नेते निर्दोष सुटलेले नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. कागल येथील घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी एका विशिष्ट धर्माच्या नेत्यांना लक्ष केले जात असल्याबद्दल आरडाओरडा केला. भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही काय असे तिखट प्रत्युत्तर सोमय्या यांनी त्यांना दिले. भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर धर्माची ढाल पुढे करण्याचा हा पवित्रा धिक्कारार्ह आहे. तपास यंत्रणा कोणाचा धर्म बघून कधीही कारवाई करत नाहीत. खरे तर हातात काही सबळ पुरावा असल्याशिवाय छापा मारण्याचे पाऊलदेखील तपासयंत्रणा उचलत नाहीत. कारण तसे केले तर त्यांना जाब विचारणारी यंत्रणा डोक्यावर असतेच. त्याशिवाय न्यायालय अशा वर्तनाची दखल घेतल्याशिवाय राहात नाही. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबद्दल गेली दीड-दोन वर्षे बरीच चर्चा होत होती. सुरूवातीला ती दबक्या आवाजात होत असे. नंतर ती उघड प्रकारे होऊ लागली. पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा परिणाम म्हणूनच या कारवाईकडे पाहायला हवे. तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. कायदा आपले काम करेलच.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply