Breaking News

शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारा युगपुरुष म्हणजे शिवाजी महाराज; नरेंद्र महाराजांचे गौरवोद्गार, किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन

महाड : प्रतिनिधी

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ -पुणे आणि स्थानिक उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.19) किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगडावर हजारो शिवभक्तांनी  हजेरी लावत शिवरायांना अभिवादन केले. यावेळी बोलताना नरेंद्र महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शून्यातून ब्रम्हांड निर्माण करणारे युगपुरुष होते असे प्रतिपादन केले.

शिवपुण्यतिथी दिनानिमित्त शुक्रवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी महापूजा करण्यात आली. यावेळी जगदिश्वर मंदिरातदेखील पूजा विधी करण्यात आला. रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती च्या वतीने राजसदरेवर श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या अभिवादन सभेस दक्षिण पीठ नाणीजचे नरेंद्र महाराज, आमदार भरत गोगावले, समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, पांडुरंग बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. हिंदू धर्म हा सर्व समावेशक असून महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी रामराज्य निर्माण केले होते. रयतेच राज्य निर्माण करताना त्यांनी राजे म्हणजे एक हुकुमशाही ही पद्धत मोडीत काढली. वतनदारी बंद करून रयतवारी सुरु केली, असे नरेंद्र महाराज यांनी यावेळी सांगितले.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असून आपण छत्रपती शिवरायांच्या चरणी निष्ठा ठेवून येणे हे आपले कर्तव्य असल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले. तर रघूजीराजे यांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला.

शिवपुण्यतिथी दिनानिमित्त शिवकालीन सरदारांच्या वारसांचा गौरव केला जातो. यावर्षी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज दिनकर राव पोतनीस यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि साहित्यिक केदार फाळके यांचाही  गौरव करण्यात आला. रायगडावरील मेघडंबरीचे शिल्पकार मनमोहन खानविलकर यांना श्रीशिपुण्यतिथी रायगड पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘शिवराय मुद्रा‘ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिवचरित्रावर आधारित घेण्यात आलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या शिवतेज जाधव, तेजस उपाध्ये, ऋषिकेश काळभोर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

-छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलौकिक आणि अतुल्य काम केले आहे. महाराज गेले नाहीत तर प्रत्येकाच्या हृदयात आहेत. यामुळे शिवपुण्यतिथी स्मरणदिन हा कार्यक्रम सोहळा म्हणूनच साजरा झाला पाहिजे.

-नरेंद्र महाराज, नाणीज.

-सर्जिकल स्ट्राईकमुळे देशातील दहशतवाद संपला नसला तरी एक वचक बसण्याचे काम केले आहे. सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सेनेचे मनोबल वाढले आहे. यामुळे भारतीय सेनेवर विश्वास ठेवा.

– राजेंद्र निंभोरकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply