Breaking News

…अन्यथा महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे थांबवावी लागतील -नितीन गडकरी

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण यात त्वरित हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी विनंतीही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

नितीन गडकरी यांनी लिहिलेले हे पत्र सध्या व्हायरल झाले आहे. अकोला, नांदेड, वाशिम, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांत किंवा या जिल्ह्यांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तिथे चौपदरीकरण व पूल बांधले जात आहेत, मात्र या कामात शिवसैनिकांकडून अडथळे आणले जात आहेत. कंत्राटदारांना धमक्या दिल्या जात आहेत, याकडे गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या पत्रात नितीन गडकरी म्हणतात, अकोला आणि नांदेड या 202 किमीच्या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाची कामे चार टप्प्यांत सुरू आहेत. यात गेडशी ते वाशिम असे वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे कामसुद्धा समाविष्ट आहे, परंतु बायपास व मुख्य रस्त्याचे काम शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी थांबवले आहे.

मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरूपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने काम थांबवण्याची परवानगी मागितली आहे.

पूलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आम्ही हाती घेतलेय. हे काम जवळपास पूर्ण झालेय. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणार्‍या रस्त्याचे काम शिवसैनिकांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत का? याबद्दल आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. ही कामे अर्धवट सोडल्यास वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील.

हे असेच चालत राहिल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल. लोकांच्या दृष्टीने आम्ही अपराधी ठरू. महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायम खंत राहील. ही कामे पुढे नेण्यासाठी आपण हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. यातून कृपया मार्ग काढावा, असे शेवटी नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

कामात अडथळा आणणार्‍यांना काँग्रेस विरोध करेल -पटोले

नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रस्ते महामार्ग  कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचे समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply