अलिबाग ः प्रतिनिधी
पेण अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा अलिबाग न्यायालयात सुरू असलेला खटला आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसा आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ईडीने जप्त केलेल्या बँकेच्या मालमत्ता विक्रीतील मोठा अडसर दूर होण्याची शक्यता आहे.
पेण अर्बन बँकेत साडेपाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सप्टेंबर 2010मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर ठेवीदारांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यावर 2011मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल होऊन आजी माजी संचालक, ऑडिटर अशा 43 जणांना अटक झाली. ईडीने या बँकेच्या अनेक मालमत्ता जप्त करून त्यावर बोजा चढवला होता. त्यामुळे या मालमत्ता विकून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात अडथळा येत होता. बँकेचे लाखो ग्राहक, ठेवीदार आजही आपल्या ठेवी परत मिळतील या आशेवर जगत आहेत. यातील अनेक जण मृत्युमुखी पडले. ठेवीदारांनी या संदर्भात अनेकदा मोर्चे, आंदोलने केली होती.
अलिबाग न्यायालयातील खटला मुंबईतील ईडी न्यायालयात वर्ग करावा असा अर्ज ईडीने केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने खटला वर्ग करण्याचा निर्णय दिला. यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर अनेक ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …