Breaking News

माथाडींना 20 हजार लसींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे करोना लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे. यामुळे माथाडी कामगारांसाठी 20 हजार लशींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ,’ असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील ‘माथाडी भवन’मध्ये दिले. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे एक हजार माथाडी कामगारांच्या लसीकरणासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

‘माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशनच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील. आज जवळपास देशातील 50 कोटी जनतेचे लसीकरण पार पडले आहे. रोज 50 ते 60 लाख लोकांचे लसीकरण होत असून, येत्या डिसेंबरपर्यंत देशातील बहुतांश जनतेचे लसीकरण होऊन देश करोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला लसीच्या 10 हजार मात्रा उपलब्ध करून देणार व ते लसीकरण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात आणखी 10 हजार मात्रा देऊन हा लसीकरणाचा उपक्रम यशस्वी करणार,’ अशी घोषणा फडणवीस यांनी या वेळी केली.

माथाडी कामगारांची संख्या 30 ते 32 हजारांच्या घरात आहे. लसीकरण न झाल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी काम करताना अडथळा येत होता. त्यामुळे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या लसीकरणाचा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

या कार्यक्रमाला नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply