पनवेल ः वार्ताहर
महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेल येथील आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने बिल्व दिन साजरा करण्यात आला. यावेळी पेण, पनवेल, गोंदिया, रत्नागिरी, बोईसर, डहाणू, अलिबाग, उरण येथे बेलाची रोपे वाटप व लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमात बेलाच्या औषधी गुणधर्मांची माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. आर्या वनौषधीच्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात वनौषधी तज्ज्ञ सुधीर लिमये, आयुर्वेदाचे अभ्यासक नरेंद्र लिमये, पत्रकार दत्तू कोल्हे, आर्या वनौषधी संस्थेचे सुधीर पाटील, विनोदकुमार जांभूळकर आदींचा सहभाग होता. बिल्व दिनानिमित्ताने यावेळी महाशिवरात्र व आयुर्वेद हा विशेष कार्यक्रमही घेण्यात आला. महाशिवरात्रीला भगवान शंकराला वाहणार्या बिल्वदल, कवठ, बिल्व फळ, धोत्रा फूल, धोत्रा फळ, आंबा मोहोर, पळस फुले आदी पत्री वाहिली जाते. या पाना-फुलांच्या औषधी गुणधर्मांची माहिती यावेळी आर्या वनौषधी संस्थेचे सुधीर पाटील यांनी दिली. बेलामध्ये असलेले अनेक गुण पाहून त्याचा समावेश ऋषिमुनींनी ईश्वर पुजेकरिता केला. देवाला वाहण्याच्या निमित्ताने या वनस्पती सहज हाताळल्या जाऊन त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची, उपयोगाची माहिती मिळावी, हाच उद्देश त्यामागचा असावा, असेही सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.