Breaking News

नवी मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम जोरात

पहिल्या डोससाठी विशेष सत्राचे नियोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाद्वारे संरक्षित व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे. 31 ऑगस्ट रोजी 20,500 डोसेस उपलब्ध झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 18 ते 30 वयोगटातील नागरिकांकरिता 83 लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले.

18 ते 30 वर्ष वयोगटाच्या नागरिकांकडून पहिल्या डोसबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार मोठ्या प्रमाणात डोसेस उपलब्ध झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये, इएसआयएस रुग्णालयातील जम्बो सेंटर, 21 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, एपीएमसी मार्केटमधील दोन केंद्र, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट याशिवाय बेलापूर विभागात आठ, नेरूळ विभागात 11, वाशी विभागात चार, तुर्भे विभागात पाच, कोपरखैरणे विभागात नऊ, घणसोली विभागात आठ, ऐरोली विभागात सात, दिघा विभागात दोन अशाप्रकारे एकूण 83 लसीकरण केंद्रांवर 18 ते 30 या वयोगटातील 17 हजार 400 नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला.

आठही विभागात कोविड लसीकरण केंद्रे मोठ्या संख्येने असल्याने सर्व 83 ठिकाणी सुनियोजित पद्धतीने लसीकरण पार पडले. यापेक्षा अधिक प्रमाणात लस प्राप्त झाल्या, तर 100 हून अधिक लसीकरण केंद्र कार्यान्वित करून दररोज 50 हजार लसीचे डोस देण्याचे नियोजन नवी मुंबई महानगरपालिकेने केले असून तशाप्रकारची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.

शासनाकडून प्राप्त होणार्‍या लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन केले जात असून प्राप्त लसीचे डोस नागरिकांना लगेच उपलब्ध करून देऊन पुढची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ लक्ष 56 हजार 444 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून तीन लक्ष 37 हजार 756 नागरिक लसीचे दोन्ही डोस घेऊन संरक्षित झाले आहेत.

कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या दुसर्‍या डोसच्या तारखेचे भान राखले जात असून त्यानुसार लसीकरणाची सत्रे आयोजित केली जात आहेत. तरी नागरिकांनी लसीकरण करून घेऊन संरक्षित व्हावे, तसेच लसीचा एक अथवा दोन्ही डोस घेतले तरी मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ राखणे ही आपली दैनंदिन जीवनाची सवय करून घ्यावी.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई मनपा

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply