कोकणची माणसे साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी म्हणतात, ते खरेच आहे. म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वे प्रशासनाने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्नभावाची वागणूक दिली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला तरी दिवा-रोहा गाडीही सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यावरून रायगड जिल्ह्यातील गणेशभक्तांच्यात नाराजी पसरली आहे.
कोकण रेल्वे रायगड जिल्ह्यातून जाते. या रेल्वे प्रकल्पासाठी रायगडमधील शेतकर्यांनी आपल्या जमिनी दिल्या, पण या रेल्वेचा फायदा मात्र रायगडवासीयांना फारसा झालाच नाही. दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांनाच याचा जास्त फायदा झाला. त्यांचा वेळ आणि पैसा वाचला. त्यांच्या राज्यात दर 20 मिनिटाने थांबणारी कोकण रेल्वे रायगडमध्ये मात्र थांबत नाही. ज्या गाड्यांना रोहा किंवा माणगाव येथे थांबा दिला आहे, त्या गाड्यांनी पहाटे मुंबईला येऊन काम आटोपून पुन्हा रात्री परत जाणे शक्य होत नाही. रोहा-दिवा गाडी सुरू असल्याने रोहा व पेण तालुक्यातील चाकरमानी या गाडीने रोज मुंबईला जाऊन येत होता. कोरोना सुरू झाल्यावर रोहा गाडी बंद केली. आज कोकणात जाणार्या गाड्या सुरू झाल्या, मुंबईत लोकल सुरू झाली, पण रोहा गाडी फक्त रेल्वे कर्मचार्यांसाठीच सुरू आहे. त्यामुळे रायगडवासीयांना लालपरीचा आणि खाजगी गाड्यांचाच आधार घ्यावा लागतो.
कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जागा दिली. त्यावेळी रायगडमधील शेतकर्याने स्वप्न पाहिले होते की, आपण आपला शेतमाल घेऊन सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत घरी येऊ, पण ते स्वप्नच ठरले. त्यामुळे खड्डेमय मार्गावरून आदळत-आपटत आपल्या शरीराच्या अनेक भागाला दुखापतग्रस्त करून किंवा कायमचे अधू करून डॉक्टरची बिले मात्र तो देत आहे. त्याच वेळी कोकण रेल्वे धडधडत समोरून जाते आणि त्यातून दक्षिणेकडील माणूस आरामात प्रवास करीत असल्याचे पाहणे त्याच्या नशिबी आले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणार्या गाड्या तोट्यात नाहीत. कोलाड स्टेशनवरून जाणार्या रो-रो सर्व्हिसमुळे कोकण रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो.
या मार्गाचे वीर-दासगावपर्यंतचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या मार्गावरून रायगड जिल्ह्यातील लोकांना सोयिस्कर ठरतील अशा गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. या गाड्या वीर किंवा माणगावहून सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील लोकांनाही त्याचा फायदा होईल. ईमू गाडी सध्या 12 डब्यांची असून ती दिवा-रोहा आणि पेण-दिवा चालवली जाते. ती गाडी 15 डब्यांची करून दासगाव किंवा माणगावहून सोडून तिच्या फेर्या वाढवणे गरजेचे आहे. पनवेल-कर्जत मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता या मार्गावरही अशीच गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अलिबागसाठीही आरसीएफ मार्गावरून रेल्वेची शटल सेवा सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक जण मुंबई, ठाणे येथे नोकरी धंद्यानिमित्त जात असतात. काही स्थायिकही झाले आहेत. ते गणेशोत्सवासाठी नेहमी आपल्या गावाला जातात. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी 175 जादा गाड्या सोडल्या आहेत. त्या पूर्ण आरक्षित आहेत. त्यांचा उपयोग रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्यांनाच जास्त होतो. रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, पेण तालुक्यांतील नागरिकांना या गाड्यांचा फायदा मिळत नाही. दिवा-रोहा गाडी सुरू असती, तर रोह्यापर्यंत या गाडीने जाऊन पुढे आपल्या गावी जाता येत होते, पण कोरोनाच्या काळात बंद केलेल्या या गाड्या मध्य रेल्वेने अद्याप सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे लालपरी किवा खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांशिवाय त्यांना पर्यायच नाही. त्याच वेळी तळकोकणात जाणारा भक्त आरामात कमी खर्चात आणि लवकर आपल्या गावी पोहचतो. त्याच्यापेक्षा अंतर कमी असूनही जास्त पैसे देऊन आणि वेळही जास्त देऊन रायगडवासीयांना आपल्या गावाला जावे लागत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून त्यांना दिलासा द्यावा
हीच मागणी रायगडचा रेल्वे प्रकल्पग्रस्त गणेशोत्सवाच्या निमित्ताने करीत आहे.
-नितीन देशमुख, खबरबात