पेण : प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी पेण तालुक्यात गावठी दारू धंदेवाल्यांच्यावर व दारू बनविणार्या हातभट्टीवाल्यांवर पेण पोलिसांनी दररोज धाडी टाकून हजारो रूपयांचा माल व तयार दारू नष्ट केली होती. या कारवाईत पेणचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह विजय धुमाळ व व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटीलही सोबत होते. मात्र दोन महिन्यानंतर या दारूबंदीच्या कारवाया थांबल्यावर पुन्हा दारूधंदे करणार्यांनी व हातभट्ट्याचालकांनी डाके वर काढले आहे.
आजही बंगलावाडी, आसानी येथे 22 भट्ट्या, कामार्ली डोंगर हद्दीत 6 धंदे तर बोरगावच्या जंगल भागात 6 धंदे, तरणखोपच्या हद्दीत 5 धंदे सुरू असल्याची माहिती व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हे धंदे व हातभट्ट्या दिवसभर सुरू आहेत. असे असतानाही या दारूविक्रेत्यांवर कारवाई होत नाही. तरी किमान वरील ठिकाणी सुरू असणारे दारूधंदे येत्या 10 जूनपर्यंत उध्वस्त करावेत, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली आहे. यानंतर स्वत: व्यसनमुक्तीचे सर्व महिला-पुरूष कार्यकर्तेही दारूभट्ट्यांवर छापा मारून मिळालेला माल खाजगी टेम्पोद्वारे पोलीस स्टेशनमध्ये आणून ओतून देतील, असा इशारा ही दिला आहे.