Saturday , June 3 2023
Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजानेे भावी वकील भारावले; भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिल्लीस शैक्षणिक सहल

गव्हाण : रामप्रहर वृत्त

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे प्रथमच विद्यार्थ्यांची दिल्ली, कुलू-मनाली येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीअंतर्गत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संसद भवन येथील लोकसभा सभागृह, राज्यसभा सभागृह, मध्यवर्ती सभागृह पाहिले आणि तेथील विशेष प्रतिनिधीने सदर ठिकाणी विद्यार्थ्यांना इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयास भेट दिली आणि योग्य त्या परवानग्या अगोदरच मिळविल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांच्या सुनावण्या प्रत्यक्ष ऐकण्याची सुसंधी मिळाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या म्युझियममध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून झालेले बदल आणि प्रचलित कार्यपध्दती जाणून घेता आली. सर्वोच्च न्यायालयाच्या दर्शनाने भावी वकील भारावून गेले. वकिली व्यवसाय नियंत्रित करणारी सर्वोच्च संघटना म्हणजेच बार कौन्सिल ऑफ इंडिया येथे जे. आर. शर्मा, अति. सचिव, बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी तेथील सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे महत्त्व आणि कार्यपध्दतीची माहिती दिली. सदर सहलीत प्राचार्या शितला गावंड यांनी    भारतीय सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल मनोजित ठाकोर यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्याची संधी सर्वांना मिळाली. मनोजित ठाकोर यांनी कायदा अभ्यासाच्या एलएलबी, एलएलएम अशा पदव्या प्राप्त केल्यानंतर कशा रीतीने सैन्य दलात प्रवेश केला याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि सैन्य दलात 15 वर्षे सेवा करताना आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

– विविध ठिकाणे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली

विविध स्थळांना भेटी सहलीत शैक्षणिक उद्दिष्ट साधतानाच दिल्ली येथील इंडिया गेट, लाल किल्ला, कुतुबमिनार आणि मनाली येथे स्नो पॉइंट, हिडिंबा मंदिर, मॉल रोड, कुलू येथील वैष्णोदेवी मंदिर, शाल फॅ क्टरी अशी ठिकाणे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यासाठी प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी पुढाकार घेऊन सर्व नियोजन केले आणि त्यांच्यासह प्राध्यापिका अनुजा राणे आणि कर्मचारी केतन देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना सोबत केली. या वेळी विविध ठिकाणे पाहून विद्यार्थीही कमालीचे प्रभावित झाले होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. महाविद्यालयाची अशी शैक्षणिक सहल आयोजित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर आणि सर्व संचालक मंडळाचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.

-खरी देशसेवा करण्यासाठी सैन्य दल हाच एकमेव पर्याय असल्याचा समज अत्यंत चुकीचा असून प्रत्येक व्यक्तीने तो करीत असलेले काम निष्ठेने आणि इमाने इतबारे करणे हीच खरी देशसेवा आहे.

-मनोजित ठाकोर, लेफ्टनंट कर्नल

Check Also

पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली …

Leave a Reply