Breaking News

संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केली सडकून टीका

मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये बोलताना खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर परखड टीका केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी पत्रातील मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते.
मुंबईत बुधवारी (दि. 8) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारने पाठवलेले पत्र अधिकार्‍यांनी लिहून पाठवले आहे. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर पाठवलेय. मुख्यमंत्र्यांनीदेखील याची पुरेशी दखल घेतली नाही, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.
संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळी संभाजीराजे यांनी केल्याचे दृश्यांमध्ये दिसून आले होते. त्याचा संदर्भ घेत संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. आवाज उठवायचा म्हटला, तर मी करू शकतो. आम्ही न बोलवता किंवा सांगतादेखील नांदेडला 50 ते 70 हजार लोक हजर होते. रायगडसारख्या ठिकाणी आम्ही सुरुवात करू. जर सरकार दखल घेत नसेल आणि आम्ही करायचे असेल तर करू शकतो. नांदेड ही फक्त एक झलक होती. तीही न सांगता. सांगून बघू का? मग बघा, असे संभाजीराजे भोसले या वेळी म्हणाले.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटलेय की 1885 कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोक एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या सरकारने केलेले आहे. तुम्ही किती दिले हे अधिकार्‍यांनी सांगावे. आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केले, त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेले नाही, असेदेखील संभाजीराजे भोसले या वेळी म्हणाले.
नांदेडमध्ये झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच मुद्द्यावरून संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला होता. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का?, असा सवाल संभाजीराजेंनी केला होता.
आमची परीक्षा घेऊ नका!
दरम्यान, आमची परीक्षा घेऊ नका. सरकारने ठरवावे, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, या वेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे कोरोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असेदेखील नमूद केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply