कळंबोली : रामप्रहर वृत्त
अजितदादा आजही आपल्यात आहेत हीच भावना सर्वांच्या मनात आहे. आपल्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांनी सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. अजित पवार यांची ओळख एक कामाचा माणूस म्हणून होती. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याचे काम करायचे आहे आणि हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळंबोली येथे शोकसभेत काढले.
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी कळंबोली येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अजितदादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
या शोकसभेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि इतर अनेकांनी उपस्थित राहून स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोकसभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक तथा शिवदास कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक विजय खानावकर, प्रदेश सरचिटणीस रूपेश पाटील, बाळूशेठ फडके, भीमसेन माळी, प्रदेश युवक सरचिटणीस रणजित नरूटे, जयसिंगराव पाटील, विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष किशोर देवधेकर, तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, युवा नेते अक्षय देवकर, सुनील सावर्डेकर, महादेव पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष मंगेश नेरूळकर, जिल्हा महिला अध्यक्ष प्रज्ञा चव्हाण, विधानसभा अध्यक्ष शेखर जळे, कासम मुलाणी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper