पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नितळस गावात उभारण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुल आपणच बांधल्याचा खोटा प्रचार शेतकरी कामगार पक्षाचे नेते डी.बी. म्हात्रे करत असल्याचा गंभीर आरोप या संकुलाचे संस्थापक अध्यक्ष व प्रशिक्षक पै. रुपेश पावशे यांनी केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पै. रूपेश पावशे यांनी स्पष्ट केले की, या कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतःच्या खिशातून सुमारे 23 लाख रुपयांचा खर्च केला आहे तसेच या संकुलाची मासिक देखभाल पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर हे दरमहा 30 ते 40 हजार रुपये स्वखर्चाने करत आहेत. असे असताना या संकुलाचे श्रेय घेण्याच्या नादात डी.बी. म्हात्रे खोटी माहिती पसरवत आहेत.
ते पुढे म्हणाले, पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून अनेक कामे त्यांनी पुढाकाराने व स्वखर्चाने केली आहेत. त्याच अनुषंगाने नितळस गावात नवोदित व होतकरू कुस्तीपटूंकरिता छत्रपती संभाजी महाराज व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सुसज्ज, राष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाच्या उभारणीच्या वेळी डी.बी. म्हात्रे यांनी केवळ पाच ते सहा लाख रुपयांची मदत केली होती. उर्वरित खर्चासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे जाण्याचा सल्ला स्वतः डी.बी. म्हात्रे यांनी दिला होता.
यानंतर लगेचच आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन संकुलाचा प्रस्ताव मांडला असता त्यांनी त्वरित होकार देत 23 लाख रुपयांचा स्वखर्च करून संकुल उभारले, मात्र निवडणुका आल्याने या कुस्ती संकुलाच्या नावावर मते मिळवण्यासाठी डी.बी. म्हात्रे जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत असून ‘हे संकुल मीच बांधले’ असा दावा करत फिरत आहेत. प्रत्यक्षात या संकुलाच्या उभारणीत आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोठा वाटा असून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून केलेला हा प्रचार पूर्णतः दिशाभूल करणारा आहे, असे पै. रुपेश पावशे यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, पावशे यांनी केलेल्या या खुलाशामुळे डी.बी. म्हात्रे यांचा दावा पूर्णपणे फोल ठरला असून त्यांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश झाला आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper