उरण ः रामप्रहर वृत्त
जनतेचा विकास करण्याऐवजी केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्याचे राजकारण केल्यामुळेच माजी आमदार विवेक पाटील यांना आज तुरूंगात शिक्षा भोगावी लागत आहे, अशी घणाघाती टीका पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. उरणमधील आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असून भाजप महायुतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून उरणमधील महायुतीचे चिरनेर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवेंद्र पाटील, चिरनेर पंचायत समिती गणाच्या उमेदवार साक्षी पाटील आणि आवरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समिधा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वशेणी, पिरकोन, सारडे आणि आवरे येथे बुधवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून पक्षाच्या नेतृत्वावर जनतेचा गाढा विश्वास आहे. विकासाचा हा रथ अविरत सुरू ठेवण्यासाठी भाजप महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे.
या बैठकांना माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, पिरकोनचे माजी सरपंच के.वाय. गावंड, भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, विभागीय अध्यक्ष मुकेश म्हात्रे यांच्यासह वशेणीचे माजी सरपंच विजय म्हात्रे, रत्नाकर गावंड, सारड्याचे सरपंच रोशन पाटील, आवर्याचे माजी सरपंच भार्गव गावंड, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सारडे गावातील विश्वनाथ माळी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे परेश ठाकूर यांनी स्वागत केले.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper