पनवेल : वार्ताहर
बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई झोनच्या अंतर्गत येणार्या नवीन पनवेल शाखेने आपल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिन मोठ्या थाटात साजरा केला.
या वेळी महात्मा फुले महाविद्यालय, पनवेलचे अर्थशात्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. नरेश मढवी, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष भोपी, बँकेच्या नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक पुष्पा खत्री, उप प्रबंधक शुभांगी शुक्ला व विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी सुभाष भोपी म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे. जेव्हापासून शिक्षक वर्ग बँकेशी जोडला आहे तेव्हा पासून बँकेच्या सेवेबद्दल सर्व शिक्षक समाधानी आहेत. बँक शिक्षकांच्या आर्थिक गरजा तत्परतेने पूर्ण करते ही सुद्धा जमेची बाब आहे.
प्रो. डॉ. नरेश मढवी म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल ही नेहमीच ग्राहकांभिमुख विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवित असते. बँकेने जो शिक्षकांचा सत्कार केला ही खरोखरच शिक्षकांना स्फुरण व अधिक चांगले कार्य करण्यासाठी उद्युक्त करणारी बाब आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुष्पा खत्री म्हणाल्या की, बँकेला त्यांच्या शिक्षक ग्राहकांचा सत्कार करतांना त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतांना अभिमान वाटत आहे, कारण की शिक्षक हा असा वर्ग आहे की, तो जीवनभर विद्यार्थी, समाज व एक चांगला देश घडविण्यासाठी काम करीत असतो.
उपस्थित शिक्षक डॉ. प्रो. नरेश मढवी, सुभाष भोपी, संदीप जुईकर, संजय सावळे, सज्जाद पठाण, सारिका रघुवंशी, रजनी इंगळे, स्वाती खराडे, मीना फुलपगारे, प्रतिभा कुडेकर, गोपीनाथ थळी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशश्वीतेकरिता सीमा मराठे, राजू म्हात्रे व रेखा जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.