पनवेल : वार्ताहर
खारघर सेक्टर-35 भागात मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे. जुबेर इलियाज खान (27) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम मेस्किलीन या अंमली पदार्थाची पावडर जप्त केली आहे. जुबेर खान याने सदरचे अंमली पदार्थ कुठून व कुणाला देण्यासाठी आणले याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
खारघर मधील पापडीचा पाडा चौकात एक व्यक्ती मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व त्यांच्या पथकाने खारघर मधिल पापडीचा पाडा चौकात रात्री सापळा लावला होता. त्यानंतर पापडीचा पाडा चौकात संशयास्पदरित्या आलेल्या तरुणाला त्या भागात दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एका फ्लॅस्टीच्या पिशवीमध्ये 2 लाख 20 हजार रुपये किंमतीची व 44 ग्रॅम वजनाची मेस्किलीन अंमली पदार्थाची पावडर आढळुन आली. या पावडरची खातरजमा केल्यांनतर पोलिसांनी मेस्किलीन पावडर जप्त करुन जुबेर खान याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.