Breaking News

महाड-मढेघाट-पुणे मार्ग विकसित व्हावा

कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विभाजनासोबतच हवामान आणि निसर्गाचे विभाजन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे झाले आहे. कोकण हा प्रांत अरबी समुद्राला समांतर असून आताच्या पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत समुद्रकिनारा आणि सह्याद्री यांच्यामधील  साधारण शंभर किमीच्या पट्ट्यातील डोंगराळ प्रदेशाला कोकण संबोधले जाते. आंबा, सुपारी, नारळ, काजूपासून वनौषधी वनस्पतीच्या जंगलांनी व्यापलेला हा प्रदेश जरी दुर्गम असला तरी येथील निसर्गसौंदर्य पृथ्वीवरील स्वर्गाची जाणीव करून देत असते. सह्याद्रीमुळे मोसमी वार्‍यांना अडविले जाते. त्यामुळे ढग अडून कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो. त्या तुलनेत घाट पठारावर पाऊस खूपच अल्प प्रमाणात बरसतो. मुंबई, वसई, कल्याण, महाड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, मालवण या जुन्या शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. हजारो वर्षांपासून समुद्रमार्गे होणारा व्यापार कोकणातील खाड्यांमधून घाटमाथ्यावरील प्रदेशात होत असे, मात्र या व्यापार आणि प्रवासात त्या वेळीही आणि आजही सह्याद्री पर्वतांचा अडथळा आणि अडसर होत आहे. कसारा घाट, जुन्नर घाट, बोरघाट, ताम्हीणी घाट, भोरघाट, आंबेनळी घाट, पाटणचा घाट, आंबा घाट, आंबोली घाट हे प्रमुख घाटमार्ग कोकण आणि घाट पठाराला जोडतात. काही ठिकाणी ताम्हीणी आणि भोरघाटात धरणांच्या जलसाठ्यामुळे हे मार्ग अंतराने लांबचे बनले आहेत. आजघडीला महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड या तालुक्यांतून पुण्याला जाण्यासाठी महाड-भोर हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. महाड, चिपळूण एमआयडीसीमधील अवजड वाहनांची वाहतूकदेखील या भोरघाटाने होत असते. पुण्यातून कोकणात येणार्‍या पर्यटकांसाठी भोरघाट हाच एकमेव मार्ग आहे, मात्र दरडी कोसळणे, रस्ता खचणे, कड्यावरचे मोठमोठे दगड कोसळणे अशा घटनांनी हा मार्ग सतत बंद असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर यावा यासाठी फडणवीस सरकारने गडकिल्ले संवर्धन मोहीम हाती घेतली. रायगड प्राधिकरणाची स्थापना करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 600 कोटींच्या निधीची तरतूद केली. नुसती घोषणा न करता फडणवीस सरकारने गडांच्या संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. यात प्राधान्याने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरील पुरातन वास्तूंची दुरुस्ती, परसबंद, पायर्‍या, रोप वे, विद्युत रोषणाई, पर्यटक निवास याचबरोबर किल्ल्याच्या परिसरातील गावांचा विकासही यात समाविष्ट करण्यात आला. यामध्ये या गावांना जोडणारे रस्ते, पाणी योजना व इतर विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याच प्राधिकरणाच्या माध्यमातून महाड-रायगड मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाला मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. याच धर्तीवर महाड-मढेघाट-पुणे या मार्गाचादेखील पर्यटन महामार्ग म्हणून विकास व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले संवर्धनाबाबत संवेदनशील असणार्‍या भाजप राजवटीतच हे शक्य आहे. महाड-मढेघाट-पुणे हा सह्याद्रीच्या एका खिंडीतून जाणारा घाटमार्ग आहे. या मार्गाला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. तो असा की सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यानंतर याच घाटातून त्यांचा मृतदेह कोकणातील त्यांच्या उमरठ या गावी नेण्यात आला होता. तेव्हापासून या घाटाला मढेघाट असे संबोधले जाते. महाड तालुक्यातील एमआयडीसी आणि बिरवाडी या प्रमुख व झपाट्याने विकसित होणार्‍या गावातून जाणारा हा मार्ग दहिवड, वाकी, मढेघाट, केळद, वेल्हा, पाबेघाट, खानापूरमार्गे पुण्याला जातो. पुणे-महाड हे हवाई अंतर केवळ 60 किमीचे आहे, मात्र आज अस्तित्वात असलेल्या मार्गाने प्रवास करण्यासाठी तब्बल 150 किमी अंतर कापावे लागते, मात्र जर मढेघाट मार्ग झाला तर तेच अंतर केवळ 96 किमी एवढेच असणार आहे. या मार्गाला पर्यटन महामार्ग म्हणून विकसित केल्यास स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, शिवथरघळ, ऐतिहासिक चवदार तळे, तोरणागड, राजगड, सिंहगड, सांस्कृतिक राजधानी पुणे तसेच दापोली समुद्रकिनारे ही पर्यटनस्थळे आणि गडकिल्ले जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या निर्मितीने मागास राहिलेल्या वेल्हा तालुक्याचा विकास होणार आहे. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न या महामार्गाच्या निर्मितीने सुटणार आहे. सध्या हा मार्ग महाड ते कर्नवडी असा सुस्थितीत आहे. फडणवीस सरकारच्या काळात रानवडी (जि. रायगड) ते कर्नवडी (जि. पुणे) असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता झाला आहे. त्यामुळे जगापासून संपर्कात नसलेल्या कर्नवडी गावच्या गेली 70 दशकांतील मरणयातना संपल्या आहेत. तसेच पुणे, डोणजे फाटा, खानापूर, पाबेघाटमार्गे वेल्हे ते केळदपर्यंत पुणे जिल्ह्यातील राज्यमार्ग अस्तित्वात आहे. केवळ 500 मीटर उंचीचा कडा फोडून दोन्ही बाजूचा मार्ग जोडणे बाकी आहे. वेळोवेळी या मार्गाचा सर्व्हे झाला, मात्र राजकारणाचा गतिरोध अडथळा ठरत आहे. त्यामुळे आता हा चमत्कार केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच करू शकतात. त्यांच्याकडेच ती दूरदृष्टी आहे. गडकिल्ल्यांना जोडणार्‍या या घाटमार्गाचा पर्यटन महामार्ग म्हणून विकास व्हावा, अशी मागणी आता सर्वत्र होऊ लागली आहे.

-महेश शिंदे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply