पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भराभरा निर्णय घेत सर्वप्रथम देशभरात झाडझूड आणि स्वच्छता सुरू केली. मग तो भ्रष्टाचाराचा केरकचरा असो किंवा गावोगाव, गल्लोगल्ली साचलेला खराखुरा उकिरडा. हे पंतप्रधानांचे सर्वंकष असे स्वच्छता अभियान होते. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्याचा पंतप्रधानांचा इरादा यात स्पष्टपणे दिसतो आणि समाधानाची बाब म्हणजे आता त्या दिशेने सारा देश वेगाने पावले टाकताना दिसत आहे.
सुमारे आठ वर्षांपूर्वी भारतामध्ये अभूतपूर्व क्रांती घडली आणि अनेक दशके काँग्रेसच्या राजकारणामुळे वैतागलेल्या भारतीय जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात देशाची सूत्रे सुपुर्द केली. नव्या भारताचा खर्या अर्थाने उदय त्याचक्षणी झाला. या परिवर्तनाचे श्रेय भारतीय जनतेलाच जाते. पंतप्रधान मोदी यांच्या काही लाडक्या योजनांपैकी स्वच्छ भारत योजना आहे. स्वच्छ भारत आणि अटल योजना या दोन योजनांच्या साथीने पंतप्रधानांनी देशाच्या कायापालटास प्रारंभ केला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आठ वर्षांनंतर शुक्रवारी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत योजना शहर हे योजनेचे पुढचे पाऊल जाहीर केले. त्याचबरोबर अटल योजनेचा पुढला टप्पा सुरू होत असल्याची घोषणा देखील केली. स्वच्छ भारत योजनेस देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक गावे कात टाकल्यासारखी स्वच्छ दिसू लागली. लोकांच्या सवयी बदलल्या. ग्रामीण भागामध्ये तब्बल दहा कोटींहून अधिक स्वच्छतागृहे उभी राहिली. हजारो गावे हगणदारी मुक्त झाली. याच योजनेचा पुढला टप्पा आता सुरू होत आहे. शहरी भागांतील स्वच्छता या टप्प्यामध्ये प्राधान्यक्रमाने विचारात घेतली जाणार आहे. लोकसंख्येच्या प्रस्फोटामुळे शहर-गावांतील व्यवस्थांवर कमालीचा ताण पडतो. शहरे विद्रुप आणि बकाल होत जातात. यास मुंबई-पुण्यासारखी मोठी शहरे देखील अपवाद नाहीत. ही सर्व शहरे कचरामुक्त करण्याचा संकल्प स्वच्छ भारत योजनेच्या दुसर्या टप्प्यात करण्यात आला आहे. अटल शहरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तन मिशन ही देखील पंतप्रधान मोदी यांची आवडती आणि यशस्वी योजना आहे. जून 2015 मध्ये अटल योजनेची मुहुर्तमेढ रचण्यात आली आणि त्यायोगे पुरेसे, मजबूत सांडपाणी वाहून नेणारे जाळे आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. सांडपाणी आणि मैला व्यवस्थापनात वाढ करणे, आपल्या शहरांना जलसुरक्षित करणे आणि मुख्यत: आपल्या शहरांनजीकच्या नद्यांमध्ये कुठेही नाल्याचे दूषित पाणी मिसळणार नाही हे सुनिश्चित करणे हेच अमृत योजनेचे लक्ष्य आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. या सर्वच गोष्टी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी किती आवश्यक आहेत हे वेगळे सांगायला नको. या दोन्ही योजनांचे दुसरे पर्व निश्चितच यशाची नवी उंची गाठेल यात शंका नाही. कारण या दोन्ही योजनांवर पंतप्रधानांचे वैयक्तिक लक्ष असणार आहे. नागरिक म्हणून आपण देखील या योजनांना सक्रिय पाठबळ द्यायला हवे. आताशा लोकांच्या सवयी बदलत चालल्या आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यांचा घातक वापर अंशत: का होईना कमी झाला आहे. तरुण पिढीदेखील चॉकलेटची वेष्टणे निमूटपणे खिशात टाकू लागली आहे. कचरा इतस्तत: टाकण्याचे प्रमाण घटताना दिसत आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशन या दोन्ही योजनांच्या दुसर्या पर्वासाठी देशाची जनता कटिबद्ध राहील अशी अपेक्षा आहे.