मुरूड : प्रतिनिधी
येथील नवाबकालीन लेडी कुलसुम बेगम रुग्णालयात सध्या लसीकरण करण्यात येत आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केद्रांमध्येच लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्याने मुरूडमधील नागरिकांना लसीकरणासाठी आगरदांडा किंवा नांदगाव येथे जावे लागणार आहे. त्यात गैरसोय होणार असल्याने मुरूडमधील लसीकरण केंद्र शहरातच ठेवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
मुरूड ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्याने तेथील लसीकरण केंद्र लेडी कुलसुम बेगम रुग्णालयात हलविण्यात आले होते. ते शहरातील नागरिकांना सोयीचे ठरत होते. दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांवरच लसीकरण करण्याच्या सूचना रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मुरूड शहरातील नागरिकांना लसीकरणासाठी आगरदांडा किंवा नांदगाव प्राथमिक आरोग्य केद्रांवर जावे लागणार आहे. त्यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिलांची फरफट होणार आहे.
मुरुड शहराची लोकसंख्या 15 हजाराच्यावर आहे. शहरात लसीकरण केंद्र नसले तर अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे मुरूडमधील लेडी कुलसुम बेगम रुग्णालयातील लसीकरण केंद्र सुरू ठेवावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनीही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लेडी ़कूलसुम बेगम रुग्णालयातील लसीकरण केंद्र सुरू ठेवावे, अशी मागणी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
नागरिकांच्या मागणीप्रमाणे मुरुड शहरातील लेडी ़कूलसुम बेगम रुग्णालयातील लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
-प्रशांत ढगे, प्रांताधिकारी, अलिबाग