गेल्या दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेले विविध घोळ पाहता महाराष्ट्राच्या जनतेला रोज कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावेसे वाटत असेल. एकेकाळी याच महाविकास आघाडी सरकारने डोक्यावर घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आता गायब असल्याचे सांगण्यात येते आहे. खरे काय नि खोटे काय हे यथावकाश बाहेर येईलच. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी सध्या गजाआड असलेला माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने परमबीर सिंह यांच्यावर बेफाम आरोप केले आहेत. खंडणीखोरीच्या प्रकरणात खुद्द माजी आयुक्तच अडकल्यानंतर सत्ताधार्यांच्या तोंडचे पाणी पळाले. परमबीर सिंह यांनी याप्रकरणीच्या कुठल्याही समन्सला दोन ओळींचे उत्तर देण्याचीही तसदी घेतलेली नाही किंवा ते चौकशीसाठी प्रत्यक्षपणे उपस्थितही राहिलेले नाहीत. याच परमबीर सिंह यांना हाताशी धरून अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या विरोधात सत्ताधार्यांनी प्रचंड शक्तीचे प्रयोग करून दाखवले होते. एकेकाळी आँख का सितारा असलेले हे माजी पोलीस आयुक्त आता मात्र अटकेच्या भीतीने पळून गेले असावेत असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षानेच परमबीर सिंह यांना फरारी होण्यास मदत केली असावी असा संशय देखील काँग्रेसचे नेते व्यक्त करू लागले आहेत. कुठल्या तरी युरोपीय देशामध्ये परमबीर सिंह दडून बसले असावेत अशी चर्चा समाजमाध्यमांवर जोरदारपणे सुरू आहे. एक मात्र खरे की महाविकास आघाडीचा माजी पोलीस आयुक्त कलंकित होऊन दृष्टीआड झाला आहे आणि त्याच सरकारात तोर्याने वावरणारे गृहमंत्री राजीनामा देऊन तोंड लपवत आहेत. काही कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदार भावना गवळी अचानक अज्ञातवासात गेल्याचे सांगितले जाते. याच पक्षाचा वनमंत्री एका युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राजीनामा देऊन घरी बसला आहे. मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे तडाखेबंद आरोप होताना दिसत आहेत. आता वर्षअखेरपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्री रुग्णालयात जातील, तर काही गजाआड जातील असे सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केले आहे. ईडीने छापे टाकल्यानंतर सत्ताधारी पक्षाचेच आनंदराव अडसूळ सध्या रुग्णालयात दाखल आहेत याबाबतची ही सूचक टिप्पणी होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमधील कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी गेले असताना त्यांनी थेट अॅम्ब्युलन्सच बोलावून घेतली. या सार्या घटनांची मालिका कशाची निदर्शक आहे? मागल्या दाराने सत्ता काबीज करणार्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात किती बजबजपुरी माजलेली आहे हेच सिद्ध करणारी ही मालिका आहे. जितके दिवस महाविकास आघाडी सरकार सत्तेवर राहील तितके दिवस अशा प्रकारच्या बातम्यांना कमतरता राहणार नाही याची खात्री आता सर्वांनाच पटली असेल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधार्यांच्या मागे जे शुक्लकाष्ठ लावले आहे, ते सहजासहजी झटकून टाकता येण्याजोगे नाही. ज्या सरकारचे गृहमंत्री आणि त्याच सरकारच्या आशीवार्दाने मुंबईची कोतवाली करणारे आयुक्त दोघांनाही बाहेरचा रस्ता धरावा लागला यापेक्षा अधिक चिंतेची बाब ती कोणती? अर्थात या सार्यामागील सत्य न्यायपालिकेच्या पुढे यशावकाश बाहेर येईलच.
Check Also
नमो चषकात कबड्डीचा थरार!
पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …