उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 2) उरण तालुका विधी सेवा समितीमार्फत उरण शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
प्रभात फेरीमध्ये उरण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश निलेश एम. वाली, सह दिवाणी न्यायाधीश राहुल बी. पोळ, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका एन. पठाडे तसेच उरण न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रभातफेरीस शुभारंभ करण्यापूर्वी दिवाणी न्यायालय क. स्तर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर प्रभातफेरीस सुरुवात करून स्टेट बँकेच्यासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रभात फेरी उरण न्यायालयापासून ते राजपाल नाका, राघोबा मंदिर, कोट नाका, चारफाटा, पालवी हॉस्पिटल, अशी मुख्य रस्त्याने काढण्यात आली.