पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याची महत्त्वाची अट शासनाने घातली आहे. ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीच्या सर्व शाळा या निर्णयामुळे सुरू होणार आहेत.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद, पनवेल महापालिकेच्या मालकीसह खाजगी शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. ही संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पुन्हा एकदा ओस पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल पहावयास मिळणार आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात 29 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून विविध अटी शर्तीच्या आधार तालुक्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना विविध अटी व शर्तीचे पालन करण्याच्या सूचना या परिपत्रकात करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण अटींचा समावेश आहे.
शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे, मात्र काही अटी, शर्तींचा यामध्ये समावेश आहे. पालक व शाळा प्रशासनाने या अटी, शर्तींचे पालन करावे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
या आहेत अटी, शर्ती
हेल्थ केअर क्लिनिकमध्ये नियमित टेम्परेचर तपासणी, शक्य असल्यास इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर परिचारिकांची मदत घ्यावी. या कामांसाठी सीएसआर किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा. मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे. शिक्षक पालक यांच्यात बैठक घेणे. शाळेतून घरात प्रवेश करताना काळजी घेणे.