भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची यशस्वी खेळी
पेण ः प्रतिनिधी
जस जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे पेणमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये एका पक्षातील कार्यकर्ते दुसर्या पक्षात प्रवेश करतानाचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयाला मिळत आहेत, पण अशा राजकारणाला शह देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले असून भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी यशस्वी खेळी करीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परत आणले आहेत.
वैकुंठ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात अमित नवाळे, प्रसाद वेदक, सुभाष पेंडसे, कैलास ढाकोळ, ओंकार ढाकोळ, सुशांत पाटील, नितेश पाटील, विनोद म्हात्रे, अनिल सावंत, प्रतिक सुतार आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमास भाजप कोकण कामगार संघटनेचे विनोद शहा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, चिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, रविकांत म्हात्रे, अशोक पाटील, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, पेण तालुक्यात सध्या लोकांना भुलवून वेगवेगळी आश्वासने देऊन पक्षात प्रवेश करून घेण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तटकरे कुटुंबीय करीत आहे. तालुक्यासाठी यांनी किती निधी दिला हा सवाल जनतेने केला पाहिजे. अनेक वर्षे मंत्रीपदी राहिलेल्या तटकरेंना पेणचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही ही शोकांतिका आहे. एखाद्या कामाचे उदघाटन होते, पण त्याचे लोकार्पण कधी होणार? याउलट आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून जवळपास चार ते पाच कोटी रुपये खर्च केले असल्याचे सांगून स्थानिक आमदार निधीतून विकासकामे मार्गी लावण्याचे काम करण्यात येत आहे. पक्ष सोडून जे गेले आहेत त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे विकासकामांच्या नावावर भूलथापा मारणार्यांनी लक्षात ठेवावे की, पेण तालुक्याचा विकास भारतीय जनता पक्षच करू शकते, असेही वैकुंठ पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण जांभळे यांनी केले.
खोट्या भूलथापांना बळी पडू नका -मिलिंद पाटील
या वेळी भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेताना म्हटले की, पेणमध्ये आमदार ठरविण्याच्या घोषणा सध्या होऊ लागल्या असून जनतेला ठाऊक आहे सध्या रायगडमध्ये कोणत्या पक्षाची घराणेशाही आहे. विविध विकासकामांच्या खोट्या प्रशासकीय मान्यता देण्याचे काम सध्या होत आहे. या खोट्या भूलथापांना जनतेने भुलू नये. डीपीडीसीचा निधी प्रत्येक पक्षाच्या सदस्य संख्येवर अवलंबून असतो. यामुळे विरोधक निधी पेणमध्ये टाकणार की श्रीवर्धनमध्ये टाकणार, असा सवाल पाटील यांनी केला. पेण अर्बन बँक, बाळगंगा धरणसारखे घोटाळे कोणाच्या कारकिर्दीत घडले हे सामान्य जनतेला चांगले ठावूक आहे. खोटे बोल, पण रेटून बोल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सध्या घेतली असून ते पाहता भाजप कार्यकर्त्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. पेण तालुक्यात भाजप बळकट करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षात आगामी काळात प्रवेशकर्त्यांची रांग लागणार आहे. पेण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून करण्यात आले. भाजपच्या काळात पेणमधील अनेक कामांना विकासनिधी दिला असून तालुक्याचा विकास आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून होत आहे.
-श्रीकांत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष