नवी मुंबई : प्रतिनिधी
1971 वर्षापासुनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर मार्गी लावला गेला. शासनाने नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावामधून सुरुवातही केली. परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय ग्रामस्थांमधून आमदार मंदा म्हात्रे यांना मिळू नये, याकरिता काही नतद्रष्ट विरोधी बोगस संघटना यांनी गावातील ग्रामस्थांना खोटेनाटे सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा
प्रयत्न त्यावेळी केला होता.
सिटी सर्व्हे बेलापूरमध्ये सुरु असताना या संघटनांनी मोर्चा काढून तो बंद केला नसता तर त्याचवेळी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळून विस्तारित गावठाणातील सर्व घरे नियमित झाली असती. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा अशा संघटना जागृत होऊन ग्रामस्थांची फसवणूक सुरु असल्याचे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील बेलापूर गाव येथे विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण अर्धे अधिक झाले असून हे सिटी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्डही मिळणार आहे. शासनाने या बाबत धोरण तयार केले असून ग्रामस्थांना 4 एफएसआय मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. परंतु सदर कामाचे श्रेय मला मिळू नये याकरिता काही संस्था, संघटना यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सिटी सर्व्हे झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड मिळणार हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे. प्रॉपर्टी कार्ड तर मिळणारच आहे, हे त्यांनाही माहित होते, परंतु तरीही विरोधकांच्या सांगण्यावरून गावातील ग्रामस्थांना भडकविण्याचे काम अशा संघटनेने वारंवार करून तसेच कायद्यांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे ग्रामसभा घेऊन प्रक्षोभक भाषणे करून ग्रामस्थांना चिथावण्याचे काम त्यावेळी या संघटनांनी केले होते. गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे.