Breaking News

श्रीवर्धनमधील जिओचा टॉवर सुरू होणार?

श्रीवर्धन : प्रतिनिधी

शहरातील राऊत विद्यालयासमोर एका खाजगी जागेमध्ये जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला असून, तो कार्यान्वीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, श्रीवर्धनमधील नागरिकांचा या मोबाइल टॉवरला प्रचंड विरोध आहे. 

श्रीवर्धनमधील र. ना. राऊत विद्यालयाच्या बाजूला एका खाजगी वाडीत जिओ मोबाइल कंपनीने टॉवर उभारला आहे. त्याला थानिक नागरिकांनी विरोध केला होता. या ठिकाणी मोबाइल टॉवर चालू करू नये, असे पत्र र. ना. राऊत विद्यालयाने नगर परिषदेला दिले होते. टॉवरच्या रेडिएशनमुळे विद्यार्थ्यांना गंभीर आजार उद्भवू शकतात, त्यामुळे या मोबाइल टॉवरला परवानगी देवू नये, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश चव्हाण यांनी केली होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता टॉवर उभारणीस नाहरकत दाखला दिला. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदरच टॉवर उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी लागणारी यंत्रणा चार दिवसांपुर्वी बसविण्यात आली आहे. ही मशिनरी टॉवरजवळ नेण्यासाठी गटारांमध्ये मातीचा भराव करून रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळ्या अगोदरही असाच रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे गटार बंद होऊन पावसाळ्यात भैरवनाथ मंदिर परिसरात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी तुंबल होते.

या भागातील पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या नैसर्गिक नाल्याला एका जमीनदाराने वळण दिल्यामुळे पाण्याचा  निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे या भागात अनेक शेतकर्‍यांनी पेरलेले भात उगवलेच नाही. ज्यांचे भात उगवले होते, ते शेतातील पाण्यामुळे कुजून गेले. या बाबत वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेने सदर जमीनदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.

श्रीवर्धन नगर परिषदेने सदर मोबाइल टॉवरचे काम तातडीने थांबवावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बुजवल्यामुळे शेतात पेरलेले दीड मण भात फुकट गेले. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. तसेच गटारात मोठे ओंडके पडल्यामुळे पावसाचे पाणी माझ्या अंगणात तुंबत आहे. याबाबत तक्रार करूनसुद्धा नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

-संतोष केळसकर, माजी उपनगराध्यक्ष, श्रीवर्धन नगर परिषद

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply