Breaking News

कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना

मुंबई ः प्रतिनिधी

कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत  झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी (दि. 21) आढावा घेतला.

या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ, सिडको अध्यक्ष आमदार सदस्य प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. विनय नातू, कुणबी समाज संघटना अध्यक्ष भूषण बरे, श्रीवर्धन, म्हसळाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. चव्हाण पुढे म्हणाले, कोकणातील पाचही जिल्ह्यांत कुणबी समाजाला जात प्रमाणपत्र मिळताना 1967च्या वास्तव्याचा पुरावा मागितला जातो. ही अट दूर करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. या संदर्भात राज्यातील इतर भागातील कुणबी समाजाचा समावेश ज्याप्रमाणे इतर मागास वर्ग म्हणून झाला आहे त्याचप्रमाणे कोकणातील कुणबी समाजाची नोंद व्हावी यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करून दाखले वाटपासाठी विशेष शिबिर आयोजित करून हे दाखले देण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले. इतर मागासवर्गीय महामंडळांतर्गत कोकण विभागाकरिता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना झाली असून या महामंडळाचे भागभांडवल वाढविण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा, तसेच कोककणातील सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील जमीन उपलब्धतेबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती मागवून अशा जमिनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना ना. चव्हाण यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply