Breaking News

बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकतील त्यांच्यासाठीच!

बीटकॉईनचा अवतार जगात येऊन आता एक तप पूर्ण झाले आहे. सरकारचा पाठिंबा नसलेले हे आभासी चलन कसे चालेल, त्याच्यावर लोक कसा विश्वास ठेवतील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे त्यात भाग घेणार्‍यांची संख्या या काळात कमीच राहिली. पण ऑक्टोबरमध्ये काही घटना अशा घडत आहेत की बीटकॉईन किंवा क्रीप्टोकरन्सी नावाने माहिती झालेली ही आभासी चलने जगातील अधिकाधिक लोक स्वीकारताना दिसत आहेत. सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांनी याकडे वळावे की नाही, हा मोठाच पेच आहे. पण त्यापूर्वी बीटकॉईनच्या जगात सध्या काय चालले आहे पहा.

गेल्या गुरुवारी म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी बीटकॉईनची किंमत एका बीटकॉईनला 66 हजार डॉलर एवढी विक्रमी झाली होती.त्याला एक कारण निमित्त झाले. अमेरिकेत बीटकॉईनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड (म्युच्युअल फंडसारखा) जाहीर झाला आणि त्याला सरकारची मान्यताही मिळाली. याचा अर्थ असा की अमेरिकन नागरिक आता शेअर बाजारासारखे बीटकॉईनच्या गुंतवणुकीवर तुटून पडणार. आर्थिक जगाचे नेतृत्व करणार्‍या अमेरिकेच्या या फंडामुळे बीटकॉईनच्या अस्तित्वाला अधिकृत स्वरूप मिळाले आहे. म्हणजे असे फंड जर इतर देशातही निर्माण झाले तर बीटकॉईनचे ट्रेडिंग जगभर वाढत जाणार आणि त्याची किंमतही.

भारतीय स्वीकारतील का?

विकसित जगातील गुंतवणूकदारांना शेअर बाजार आणि त्यावर आधारित आर्थिक उत्पादने नवी नाहीत. तेथील निम्म्यापेक्षा अधिक जनतेची गुंतवणूक त्या उत्पादनांत आहे. त्या तुलनेत भारतीयांनी अजून शेअर बाजाराचाही स्वीकार केलेला नाही. मग ते बीटकॉईन स्वीकारतील का? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. पण आकडेवारी असे सांगते की भारतीयही त्यात भाग घेऊ लागले आहेत. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने भाग घेणार्‍या नागरिकांची टक्केवारी खूप कमी असते, पण ती कमी असूनही विकसित देशांच्या तुलनेत ती अधिक ठरते. त्यामुळेच टक्केवारीच्या दृष्टीने कमी असूनही गेल्या काही दिवसांत बीटकॉईनच्या ट्रेडिंगचे मूल्य 100 टक्के वाढले असल्याचे बीटकॉईन एक्स्चेंजेसनी म्हटले आहे. बीटकॉईनच्या किंमती वाढल्यामुळे त्याचे जगातील मूल्य आता 2.6 ट्रिलियन डॉलर झाले आहे. याचा अर्थ ते आता भारताच्या जीडीपीशी स्पर्धा करू लागले आहे. बीटकॉईनचे मूल्य गेल्या 12 वर्षात एवढे होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बंदी घालणे, एवढे सोपे नाही

आता प्रश्न असा निर्माण होतो की काहीही न करता अशा पद्धतीने पैसा कमावणे, जग मान्य करणार आहे का आणि ज्याला कोणत्याही सरकारचा पाठिंबा नाही, अशा बीटकॉईन्सचे व्यवहार जगाला कोठे घेऊन जाणार आहेत? पण आर्थिक जगाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. ती एक कमोडिटी आहे, त्यामुळे त्याच्या व्यवहारांवर बंदी घालता येणार नाही, असे न्यायालयीन निर्णय येऊन गेले आहेत. भारत सरकारने त्याविषयी काळजी व्यक्त करून बंदीचा बडगा उगारला होता, पण तो चालला नाही. याचा अर्थ असा की देशांच्या चलनाशी स्पर्धा करणार्‍या बीटकॉईन्सच्या व्यवहारांवर बंदी घालणे, एवढे सोपे नाही, हे भारताच्या आणि जगाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश आपले डिजिटल चलन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.

266 डॉलर ते  66 हजार डॉलर!

भारतातील उच्च उत्पन्न गटातील बहुतेक नागरिकांनी शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेली असते. हा वर्ग आर्थिकदृष्ट्या साक्षर तर असतोच, पण अतिशय सजग असतो. जेव्हा बीटकॉईनची भारतात ओळख तयार होत होती, तेव्हाच या वर्गातील अनेकांनी त्यात गुंतवणूक सुरू केली होती. बीटकॉईनच्या किमतीतील चढउतार हा वर्ग सहन करू शकतो. 2015 मध्ये एका बीटकॉईनचा दर होता 266 डॉलर आणि आज आहे 66 हजार डॉलर! अगदी गेल्या एका वर्षाचा विचार करावयाचा झाला तरी नोव्हेंबर 2020 मध्ये तो दर होता 13 हजार डॉलर आणि एकाच वर्षांत तो झाला त्याच्या पाच पट! पुढे, पुरेशी माहिती न घेता जे या गुंतवणुकीत पडले, ते नागरिक चांगलेच पोळून निघाले, पण आता काही भारतीय गुंतवणूकदार आता या गुंतवणुकीत स्थिरावले असल्याचे दिसते. कारण आता ते सारखी खरेदी विक्री न करता दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहू लागले आहेत, असे भारतातील बीटकॉईन एक्स्चेंजेसचे निरीक्षण आहे. (काही बीटकॉईन एक्स्चेंजेसची नावे अशी – मुंबई- WazirX, CoinDCX, बंगळुरू – CoinswitchKuber, ABuyUCoin.ही नावे आपल्यासाठी आज नवी असली, तरी इंग्रजी वर्तमानपत्रांच्या आर्थिक पानांवर आणि अर्थविषयक टीव्ही चॅनेलवर ती नियमित दिसू लागली आहेत. याचा अर्थ त्याला वाचक आणि प्रेक्षक आहे, असा होतो.

भाग घ्यावा की न घ्यावा?

बीटकॉईन्सचे व्यवहार ही एक साखळी आहे. कोणा एका माणसाने काही गणिते संगणकावर करून ठेवली असून ती सोडवून बीटकॉईन तयार होतात. त्याला मायनिंग म्हणतात. ते त्या क्षेत्रातील काही अभियंते जगभर करत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे हे सर्व शक्य होते. ही अशी साखळी आहे, ज्यात मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे मानले गेले आहे. थोडक्यात, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा बीटकॉईन्स हा एक भाग आहे. या तंत्रज्ञानाचा बँकिंग, भूमापन अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर सुरूही झाला आहे. इंटरनेटने जसे जग बदलले, तसाच एक मोठा बदल हे तंत्रज्ञान करण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे त्यातील फक्त बीटकॉईन्सला नकार देता येणार नाही, असे आज जगाने ठरविलेले दिसते. थोडक्यात, त्याचे अस्तित्व आपल्याला मान्य करावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या किंमती वाढत जाणार, त्याचे ट्रेडिंग होत राहणार, त्यावर सट्टा खेळला जाणार, हे ओघाने आलेच. आपण त्यात पडायचे की नाही, याचे एकच उत्तर आज दिले जाऊ शकते, ते म्हणजे ज्याला त्यातील जोखीम मान्य आहे, त्याने भाग घ्यावा. ज्याला मान्य नाही, त्याने भाग घेऊ नये. नाहीतरी शेअर बाजार आणि कमोडिटी बाजारातील ट्रेडिंगमध्येही जोखीम असताना ते करणारे लोक आहेतच की!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply