Breaking News

पेटीएमचा सुपरडुपर आयपीओ कसा असेल?

डिजिटल व्यवहार सुलभ करण्याची सुरुवात ज्या पेटीएमने केली, त्याची कंपनी म्हणजे ‘वन 97 कम्युनिकेशन्स’. तिच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे. सर्वात मोठा आयपीओ, असे त्याचे वर्णन केले जात असल्याने त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे.

मागील आठवड्यातील लेखात आपण नायका कंपनीबद्दल पहिले तर आज आपण आगामी आणखी एका सुपरडुपर आयपीओबद्दल जाणून घेऊयात. 8 नोव्हेंबर 2016 रोजी डिजिटल इंडियासाठी नवीन दालन उघडलं गेलं आणि आज प्रत्येकाच्याच ते अंगवळणी पडलं. फेरीवाल्यांपासून ते उच्चभ्रू वर्गातील वर्तुळात याबद्दल केवळ चर्चाच नाही तर त्याचा सर्रास वापर होऊ लागला, त्याबद्दलच्या जाहिराती देखील सरळ, सुलभ, कळतील अशा केल्या गेल्या, पेटीएम करो! आणि आज आपण पाहतोय की आपल्या बहुतांश व्यवहारांचा हा अविभाज्य भाग बनला गेलाय. ही कंपनी सुरुवातीस पेमेंट वॉलेट, युनिफाईड पेमेंट्स वरून आता पेमेंट बँक, स्टॉकब्रोकिंग, म्युचअलफंड्स, इन्शुरन्स या विश्वात देखील दाखल झालेली आहे.

‘पे थ्रू मोबाइल’, संक्षिप्तपणे पेटीएम हे उत्पादनाचं नांव असून याच्या कंपनीचं नांव ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ असं आहे. ही एक नोएडा स्थित डिजिटल पेमेंट सिस्टम, ई-कॉमर्स आणि फायनान्समध्ये माहीर असलेली एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. सध्या पेटीएम 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि मोबाईल रिचार्ज, युटिलिटी बिल पेमेंट, प्रवास, चित्रपट बुकिंग, फार्मसी बिल, शैक्षणिक संस्थांचं शुल्क भुगतान, इव्हेंट बुकिंग त्याचप्रमाणे क्यूआर कोडच्या साहाय्यानं किराणा, दुकान, फळं आणि भाजीपाला दुकानं, रेस्टॉरंट्स, पार्किंग, टोल इत्यादी ऑनलाइन वापर-व्यवहार प्रदान करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतभरातील दोन कोटीहून अधिक व्यापारी आपल्या बँक खात्यात पेमेंट स्वीकारण्यासाठी त्यांच्या क्यूआर कोड पेमेंट सिस्टमचा वापर करतात.

कंपनीचा इतिहास – पेटीएमची स्थापना ऑगस्ट 2010 मध्ये नोएडा येथील संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने केली होती. जानेवारी 2014 पर्यंत, कंपनीनं पेटीएम वॉलेट लॉन्च केलं होतं, जे भारतीय रेल्वे आणि उबरनं पेमेंट पर्याय म्हणून आपल्या प्रणालीबरोबर जोडलं होतं. ई-कॉमर्समध्ये ऑनलाईन व्यवहार आणि बस तिकिटिंगसह ते सुरू झाले. 2015 मध्ये, त्यात शिक्षण शुल्क, मेट्रो रिचार्ज, वीज, गॅस आणि पाणी बिल अशा उपयोगितेच्या भरण्यासंबंधित गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या, मात्र नोटबंदीनंतर सर्वत्र पेटीएमचा बोलबाला झाला आणि जवळपास सर्वच विक्रेत्यांकडं पेटीएमच्या क्यूआर कोडसह पेटीएम लोगो सर्वत्र झळकू लागले. क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोड तंत्रज्ञानामुळं हे व्यवहार अगदी सुकर झाले आणि लगेचच काही महिन्यांतच 10 कोटी अ‍ॅप डाऊनलोडचा टप्पा पार करणारं हे भारताचं पहिलं पेमेंट अ‍ॅप ठरलं. त्याच वर्षी म्हणजे 2017 मध्ये कंपनीनं पेटीएम गोल्ड लॉन्च केलं जे वापरकर्त्यांना 1 ग्रॅम इतकं शुद्ध सोनं ऑनलाइन खरेदी करण्याची मुभा देतं. नंतर कंपनीनं पेटीएम पेमेंट्स बँक आणि ‘इनबॉक्स’, चॅट पेमेंटसह एक मेसेजिंग प्लॅटफॉर्म देखील लॉन्च केला. पुढं 2018 मध्ये कंपनीनं व्यापार्‍यांना शून्य % शुल्कावर थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये पेटीएम, यूपीआय आणि कार्ड पेमेंट स्वीकारण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली. कंपनीनं ‘पेटीएम फॉर/विथ बिझनेस’ अ‍ॅप लाँच केलं आणि व्यापार्‍यांची समस्या समजून पैसे मिळाल्यावर व्हॉइस अनाऊन्समेंट डिव्हाईस देऊ केलं जेणेकरून प्रत्येक वेळेस मोबाईलवर किंवा खात्यामध्ये ग्राहकांनी दिलेले पैसे जमा झाले का नाही याची शहानिशा करत बसण्याची गरज भाऊ नये आणि व्यापार्‍यांना त्यांच्या पेमेंट आणि दैनंदिन सेटलमेंटचा मागोवा घेण्याची सोय पुरवली गेली.

कॅनेडियन पेमेंट्ससाठी कंपनीनं मार्च 2017 मध्ये कॅनडामध्ये आपले हात-पाय पसरले, तर जानेवारी 2018 मध्ये, कंपनीनं चीनच्या अलिबाबा समूहाच्या मालकीची गेमिंग कंपनी एजीटेक होल्डिंग्जच्या संयुक्त उपक्रमात गेमपिंड हे एक मोबाइल गेमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केलं. ऑक्टोबर 2018 मध्ये कंपनीनं जापनीज फिनटेक मार्केटमध्ये सॉफ्टबँक व याहू,जपान बरोबर पेपे (झरूझरू) हे मोबाईल पेमेंट अ‍ॅप उपलब्ध केलं. मार्च 2019 मध्ये, कंपनीनं पेटीएम फर्स्ट नांवाचा सबस्क्रिप्शन बेस्ड लॉयल्टी प्रोग्राम लॉन्च केला आणि मे 2019 मध्ये, पेटीएम फर्स्ट क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी सिटी बँक बरोबर भागीदारी केली. मागील वर्षीच्या महामरीमध्ये टाटा स्टारबक्सनं पेटीएम बरोबर भागीदारी केली (जुलै 2020) आणि त्यांच्या ग्राहकांना साथीच्या वेळी ऑनलाईन अन्नपेयं मागवण्याची सोय झाली. कंपनी रिटेल क्षेत्रात देखील ऑनलाईन प्रणालीसह उतरली असून फेब्रुवारी 2017 मध्ये पेटीएमने आपले पेटीएम मॉलअ‍ॅप लाँच केलं जे ग्राहकांना 1.4 लाख नोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचं समाधान देतं.

सध्या कंपनी खालील उत्पादनाद्वारे उत्पन्न मिळवते…

जाहिराती – कंपनी कमाई वाढवण्यासाठी त्यांच्या अ‍ॅपवर जाहिराती आणि सशुल्क प्रचार सामग्री वापरते.

पेमेंट वॉलेट – (रिचार्ज आणि बिल भरण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात नेटवर्क प्रदात्यांकडून कमिशन गोळा करते. ग्राहकांनी आपल्या पेटीएम ई-वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांवर पेटीएम भागीदार बँकांपैकी एक एस्क्रो खाते उघडून आणि परस्पर सहमत व्याजदर मिळवून व्याज मिळवते.

पेटीएम पेमेंट्स बँक – पेटीएम पेमेंट बँक बचत खाती, तसेच डेबिट कार्ड आणि जलद आणि सुलभ पेमेंट करण्याची क्षमता देते. ते सध्या या ठेवींमधून शक्य तितका नफा घेत नाहीत कारण ते हे पैसे उधार देऊ शकत नाहीत. पेटीएम पेमेंट्स बँक एक लहान फायनान्स बँक बनू इच्छित आहे आणि फास्टॅगनं या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ जाण्यास मदत केली आहे.

यूपीआय – पेटीएम सुरुवातीला यूपीआय व्यवसायावर लक्ष केंद्रित करून होतं, परंतु त्यांच्या अपेक्षेनुसार ते काम करत नाही हे लक्षात आलं आणि त्याच्या वाढीसाठी विपणनावर देखील भरपूर पैसा खर्च करावा लागतो. तरीदेखील यात आपसूक भर पडत जाईल. 

फास्टॅग टोल कलेक्शन – फास्टॅग ही एक उत्तम व्यवसाय संधी आहे ज्यामध्ये पेटीएमने उडी घेतलेली आहे. पेटीएमला फास्टॅग सुरक्षा ठेवींद्वारे सुमारे 69 कोटी रुपये मिळाले आणि आता हे पैसे गुंतवणूक आणि व्याज मिळवण्यासाठी वापरले जातील.

पेटीएम क्रेडिट – सध्या पेटीएम क्रेडिटनं मोठा प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी क्रेडिट आणि ग्राहक क्रेडिट हे त्यांच्या क्रेडिट विभागाचे दोन भाग आहेत. ग्राहक क्रेडिटमध्ये पेटीएम पोस्टपेड (म्हणजे एक महिन्याची क्रेडिट मर्यादा), वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड यांसाठी एसबीआयसह भागीदारीत असून त्यासाठी पेटीएमला सुमारे 2-6% युनिट फी मिळते. सध्या या पर्यायात बजाज फायनान्स हा त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. तर, सक्रिय व व्हेरीफाईड व्यापार्‍यांना त्यांच्या वॉलेट क्रियाकलापावर आधारित क्रेडिट दिले जाते.

पेटीएम मनी – वर उल्लेखल्याप्रमाणं पेटीएमनं पेटीएम मनीद्वारे गुंतवणूक प्रकारात पाऊल ठेवलं आहे. कंपनीनं डायरेक्ट म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करण्यास संधी उपलब्ध करून दिल्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याचा लाभ होताना दिसत आहे आणि त्यामुळं कंपनीस प्रचंड प्रमाणात वापरकर्ता अधिग्रहण होण्यास मदत झाली आहे, ज्यामुळं पेटीएम, नवीन एसआयपीचे भारतातील सर्वात मोठे प्रवर्तक बनलेले आहेत. त्याचप्रमाणं स्टॉकब्रोकिंगमध्ये पेटीएम किरकोळ गुंतवणूकदारांना कोणतेही शुल्क न आकारता डीमॅट खातं प्रदान करत आहे आणि डिलिव्हरीसाठी शून्य ब्रोकरेज तर झिरोधा या अग्रगण्य कंपनीस टक्कर देण्यास इंट्राडे ब्रोकरेज हे केवळ रु. 10 ठेवलं गेलं आहे जिथे झिरोधा आणि अपस्टॉक्स 20/ऑर्डर मुळं प्रसिद्ध झाली होती. पेटीएमद्वारे त्यांच्या व्यासपीठाद्वारे पेन्शन योजना आणि सोन्यासाठी केलेल्या गुंतवणूकीवर देखील फी मिळवली जाते.

पेटीएम विमा – पेटीएम लहान लहान इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोनसाठी मायक्रो इन्शुरन्ससोबत टर्म, आरोग्य, मोटर यांसारख्या विमा सुविधा देखील पुरवतं. पॉलिसी बाजार हा त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. पॉलिसी बाजारचे दर पेटीएमच्या दरांपेक्षा किंचित जास्त आहेत. उर्वरित जगाच्या तुलनेत, भारतामध्ये विमा क्षेत्रात मोठी संधी असून त्यास योग्य प्रकारे हाताळल्यास पेटीएमसाठी हा एक उज्ज्वल यशाचा मार्ग ठरू शकतो.

ई कॉमर्स – यांखेरीज कंपनी पेटीएम मॉलद्वारे ईकॉमर्स मध्ये दाखल झालेली आहेच व ऑफलाईन व्यवसायिकांद्वारे त्यांच्या पॉईंट ऑफ सेल वरून झालेल्यास व्यवहारांवर 1.8-2% चार्जेस आकारत आहे. पेटीएम ऑनलाइन व्यापार्‍यांसाठी पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्म प्रदान करते. भारतातील काही आघाडीच्या ऑनलाइन कंपन्या, ज्यात बिग बास्केट, स्विगी, खठउढउ आणि णलशी यांचा समावेश आहे, त्यांच्या ऑनलाइन चेकआउटसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मोबिक्विक, रेझरपे, सीसी अव्हेन्यू हे सध्याचे स्पर्धक आहेत.

कंपनीची ग्रॉस मर्चंट व्हॅल्यू (ॠचत) वर्षानुवर्ष वाढत आहे. जीएमव्ही हे व्यापार्‍यांना एका कालावधीत पेटीएमअ‍ॅपवरील व्यवहाराद्वारे केलेल्या एकूण पेमेंटचं मूल्य आहे. यात पैसे हस्तांतरणासारख्या कोणत्याही ग्राहक-ते-ग्राहक पेमेंट सेवेचा समावेश नाही. कंपनीचा एकूण व्यापारी वर्ग आर्थिक वर्ष 19 मध्ये 11.2 दशलक्ष वरून वाढून आता 21.1 दशलक्ष झाला आहे. पेटीएमचं कार्यकारी उत्पन्नातील 75% हिस्सा हा व्यापारी पेमेंट सेवांमधून येतो आहे. कंपनीचं एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या 3540.77 कोटी रुपये उत्पन्नावरून या वर्षी 3186.8 कोटी रुपयांवर आलेलं असून तोटा 2943 रुपयांवरून 1704 कोटी रुपयांवर आला आहे. एकूणच डिजिटल पेमेंटचा वाढता उपयोग आणि प्रत्येक आर्थिक क्षेत्रातील कंपनीचा प्रवेश हा नक्कीच डिजिटल इंडियासाठी स्वागतार्ह आहे आणि कंपनीचं भविष्य देखील यावरच अवलंबून आहे. अशा जबरदस्त भारतीय कंपनीचा आयपीओ पुढील महिन्यात येण्याचे संकेत आहेत ज्यासाठी 16600 करोड रुपयांची आतापर्यंतची सर्वांत मोठी प्राथमिक समभाग भागविक्री करण्यास कंपनी सरसावली आहे. (या आधी कोल इंडिया 15200 कोटी व रिलायन्स पॉवर 11000 कोटी रुपये) नक्कीच ही कंपनी ऐन दिवाळीमध्ये धमाका करणार हे नक्की…

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply