Breaking News

सुधागड किल्ल्याचे संवर्धन; दुर्गप्रेमींचा पुढाकार

पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व वास्तू सावरण्याचे व सुरक्षित करण्याचे काम स्थानिक, ग्रामस्थ आणि ’बा रायगड परिवारातील’ सदस्यांनी नुकतेच केले.

पुन्हा झालेल्या सुधागड संवर्धन मोहिमेत भोराई देवीचा गाभारा व समोरचा भाग पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. मंदिराच्या परिसरात इतरत्र पसरलेले पत्रे व लाकडे एका ठिकाणी व्यवस्थित जमा करण्यात आली. याशिवाय मंदिराच्या तिन्ही बाजूच्या भिंती पावसाच्या पाण्याने भिजून खचू नये यासाठी त्यावर प्लास्टिकचे आच्छादन करून काही प्रमाणात का होईना सुरक्षित करण्यात आल्या. बा रायगडचे सहकारी, हिंदवी स्वराज्य परिवारचे सहकारी व सुधागड तालुक्यातील तरुण या शिवकार्यात सहभागी झाले होते. शिवाय भोराई ट्रस्टही या सगळ्यात सहकार्य करीत आहे.

चक्रीवदळात किल्ल्यावरील पंत सचिवांचा वाडा, भोराई मंदिर, शिवमंदिर, राजलक्ष्मी मंदिर तसेच इतर ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळानंतर बा रायगड परिवाराचे सदस्य रोशन बेलोसे, दत्तात्रय सावंत, मनोज थिटे, भरत महाडिक, योगेश शिर्के, शेखर तांबट यांनी पुढाकार घेऊन परिवाराचे रायगड विभागातील स्थानिक सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन गडावर वादळामुळे पडलेले वाड्याचे व मंदिराचे छत व्यवस्थित बाजूला करून ठेवले. पावसाळ्यात कोणतेच बांधकाम करणे उचित नसल्याने पावसाळ्यानंतर मंदिरे व वाड्याचे काम सुरू

करण्यात येणार आहे. त्याआधी सर्व मंदिरांवर ताडपत्री टाकण्यात आली.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply