सारी दुनिया का बोझ हम उठाते है,
लोग आते है, लोग जाते है,
हम यही पे खडे रह जाते है.
कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टाऱ अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कुलीच्या भूमिकेने रेल्वे स्टेशनवरील या कुलीला (स्टेशनसेवक) प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हिलवाल्या बॅगमुळे प्रवासी स्वावलंबी झाले आहेत. त्यामुळे पनवेल स्टेशनवरुन कुली हद्दपार झाला असून, लवकरच तो मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
लाल डगला आणि हाताला बिल्ला लावलेला कुली हे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हमखास दिसणारे दृश्य. कुलीची लगबग सुरू झाली की गाडी येणार याची सूचना प्रवाशांना मिळत असते. गाडी फलाटावर येताच कुली लहान मुले आणि सामान असलेले किवा वृद्ध प्रवासी कोठे आहेत, हे पाहून तिकडे धाव घेणार. त्यांचे सामान टॅक्सी किंवा रिक्षापर्यंत नेणार. हो, कुली फक्त पुरुष असतात अशा भ्रमात राहू नका. मंजुदेवी ही पहिली महिला कुली राजस्थानच्या जयपूर स्टेशनला काम करीत होती. आपल्या पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवाण्यासाठी तिने पतीचा व्यवसाय करण्यासाठी रेल्वे अधिकार्यांकडे परवाना मागितला. सुरुवातीला विरोध झाला, पण नंतर तिला परवाना दिला. कुली हा रेल्वेचा कामगार नसून त्याला सेवा देऊन कमाई करण्यासाठी हा परवाना दिला जातो, पण आज हे दृश्य दुर्मिळ होत चालले आहे. कारण रेल्वे अधिकारी नवीन परवाने देत नाहीत. जे जुने परवानाधारक आहेत त्यांची संख्या अत्यंत थोडी असून आहेत ते आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर काही वर्षापूर्वी एका अनधिकृत कुलीने रात्री उतरलेल्या एका तरुणीवर बलात्कार केल्याने आता अनधिकृत कुलींना स्टेशनच्या फलाटावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, दादर, बांद्रा आणि कुर्ला, तसेच ठाणे, कल्याण या महत्त्वाच्या स्टेशनवर कुलींची संख्या कमी आहे. जे आता आहेत ते पुढील दोन-तीन वर्षात निवृत्त होतील. पनवेल स्टेशनवर तर अधिकृत कुलीच नाही. प्रवाशांना
स्टेशनवर कुली उपलब्ध होत नसल्याने आपले सामान स्वतःच घेऊन जावे लागते. या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात.
पनवेल स्टेशनवरून रोज लाखो प्रवाशी येतात-जातात. त्यांना आपल्या बॅगांवर पिशव्या त्यावर लहान मुले अशी कसरत करीत अरुंद आणि धोकादायक पुलावरून गाडी पकडायला जावे लागते. आशा वेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? याचा खुलासा रेल्वेचे अधिकारी करीत नाहीत.
खासदार पी. के. कृष्णदास यांच्या नेतृत्वाखालील रेल्वेची प्रवाशी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्यावर आली होती. या समितीने बुधवारी
(दि. 27) पनवेल स्टेशनवर पाहणी केली. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी पनवेल स्टेशनवर लिफ्टची सोय नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना सामान घेऊन जिने चढून जाताना त्रास होतो. त्यातच कुली नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याकडे समितीचे लक्ष वेधले. पनवेलमध्ये 25-30 जण स्टेशन बाहेर कुलीचे काम करतात पण ते प्रवाशांचे सामान घेऊन फलाटापर्यंत येऊ शकत नाहीत, आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या लोकांकडून वर्तणुकीचा पोलीस दाखला आणि फी घेऊन परवाना दिल्यास त्यांनाही रोजगार मिळेल. रेल्वेलाही महसूल मिळेल आणि प्रवाशांची सोय होईल. पण रेल्वेचे अधिकारी याला तयार
नसल्याने आता फलाटावरील लाल डगला आणि हाताला बिल्ला लावलेला कुली हद्दपार होणार यात शंका नाही.
-नितीन देशमुख