सरपंच मनीष नांदगावकर यांची उपविभागीय अधिकार्यांकडे मागणी
मुरूड : प्रतिनिधी
तौत्के चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील मच्छीमार, शेतकरी व स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यापैकी अनेकांना शासकीय मदत येऊनसुद्धा ती मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करून येथील आपद्ग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तौत्के चक्रीवादळ व महापुरात मुरूड तालुक्यातील अदाड, खारीकवाडा, खारदौडकुले, वाळवंटी, उसरोली, मजगाव नांदगाव, बोर्ली आदि गावांतील मालमत्ता व शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच कोर्लई, बोर्ली, मजगाव, मुरुड राजपुरी, नांदगाव या भागातील मच्छिमार होड्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामेसुद्धा करण्यात आले होते. शासकीय मदत प्राप्त होवूनसुद्धा अनेक आपद्ग्रस्तांना पैसे मिळाले नाहीत. नुकसान भरपाईचे पैसे गेले कुठे याची चौकशी करावी, असे नांदगावकर यांनी उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील अतिवृष्टी आणि वादळग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. शेती, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान या हेडखाली पैसे उपलब्ध झाले होते, त्यांचेही वाटप झाले आहे. एखाद्याला नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नसतील, तर त्याची माहिती द्यावी, त्याला त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.
-रवींद्र सानप, नायब तहसीलदार, मुरूड