Breaking News

परळीत डंपर पेटला, क्लिनर होरपळला

पाली : सुधागड तालुक्यातील परळीत विज वाहिनीला चिकटल्यामुळे डंपर पेटल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. त्यात डंपरचा क्लिनर गंभीररित्या भाजला असून, त्यास तातडीने खोपोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाली येथून खडी भरलेला डंपर शुक्रवारी सकाळी 10वाजताच्या सुमारास परळी येथील मोनिका कंस्ट्रक्शन येथे  आला होता. खडी खाली करण्यासाठी डंपरचा पाठीमागील भाग वर केला असता जीवंत विज वाहिन्यांचा स्पर्श होऊन सदर डंपरने पेट घेतला. यावेळी डंपरमधील क्लिनर प्रल्हाद राठोड (वय 32) या आगीत होरपळला. पाली पोलिसांमार्फत पुढील कारवाई सुरु आहे.

कुरुळ खूनप्रकरण; आरोपी गजाआड

अलिबाग : तालुक्यातील कुरुळ येथे झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे. राजेंद्र मगर व कुलदीप चौहान अशी त्यांची नावे आहेत. बरेच दिवस ते पोलिसांना गुंगारा देत होते. जमीनीच्या वादावरून राजेंद्र मगर याने आपला भाऊ जितेंद्र याला ठार मारण्याचा कट आखला होता. कुरुळमधील दत्त टेकडीवर 31 मार्च रोजी रात्री जितेंद्र आपल्या मित्रांसमवेत पार्टीला गेला असता मारेकरी पाळत ठेवून होते, ते दुचाकीवरून परतत असताना कुलदीप चौहान याने गोळीबार केला. या गोळीबारात सागर पाटील हा तरुण ठार झाला. तर गौरव भगत जखमी झाला. दोन भावांच्या वादात तिसर्‍याच तरुणाचा यात नाहक बळी गेला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेपासून मुख्य सुत्रधार राजेंद्र मगर व कुलदीप चौहान फरार झाले होते. गेल्या महिन्या भरापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. वेगवेगळ्या मार्गाने अलिबाग पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

नागोठण्यात बुद्ध पौर्णिमा साजरी

नागोठणे : बुद्ध पौर्णिमा अर्थात तथागत गौतम बुद्ध यांची जयंती येथील रमाई नगरमध्ये शनिवारी (दि. 18) धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी रमाई नगरातील सारनाथ बुद्ध विहारात नितीन गायकवाड, हेमंत जाधव, मयूर गायकवाड यांचे हस्ते पूजापाठ करण्यात आला. यानंतर भगवान गौतम बुद्ध यांचे जीवन कार्यजीवनावर अनेक वक्त्यांनी विचार मांडले. चंद्रकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला निवृत्त शिक्षक भास्कर सोलेगावकर, शांताराम गायकवाड, भागूराम जाधव, अशोक गायकवाड, प्रकाश आर्डे, तुळशीबाई गायकवाड, शकुंतला गायकवाड, वत्सला गायकवाड आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

कर्जत-मुरबाड रस्त्यावर वृद्धाची आत्महत्या

कर्जत : पत्नीच्या वियोगामुळे काही वर्षे नाराज असलेल्या 52 वर्षाच्या व्यक्तीने कर्जत-मुरबाड रस्त्यावर गळफास लावून आत्महत्या केली. कर्जत-मुरबाड रोडवरील कडाव गावाच्या पुढे रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाला गळफास लावून कोणी तरी शनिवारी (दि. 18) पहाटे आत्महत्या केली असल्याची माहिती कडाव येथील पोलीस पाटील रमेश पवाळी पाटील यांनी कर्जत पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास कर्जत पोलीस तेथे पोहचले, त्यांनी माहिती घेतली असता ती व्यक्ती त्याच भागातील वंजारवाडी या कातकरी वाडीमधील असल्याची माहिती मिळाली. प्रभाकर गणपत वाघमारे (वय 52) आपल्या मुलीकडे वंजारवाडी येथे काही दिवसांपासून राहत होते. वाघणारे यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि आपल्या पत्नीच्या वियोगामुळे त्यांना एकटेपणा जाणवत होता. त्यातून शनिवारी रोजी प्रभाकर गणपत यांनी गळफास घेत आपल्याला संपवून घेतले.

महाड नांगलवाडी येथे दुकान गाळे फोडले

महाड : महाड एमआयडीसी परिसरातील नांगलवाडी येथे गुरुवारी  मध्यरात्री दुकानांचे दोन गाळे फोडल्याचे उघड झाले आहे. महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील समर्थकृपा कॉम्प्लेक्समधील ऑनलाईन शॉपीच्या दुकानाचे दोन गाळे अज्ञात चोरट्यांनी फोडले. या चोरीत 53 हजार 388 रुपये रोख रक्कम, पाच हजार रुपये रक्कम असलेली तिजोरी, चार हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही रेकॉर्डर असा जवळपास 67 हजार 388 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरांनी लंपास केला. या बाबत विनायक नरे यांनी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत.

हमरापूर येथे इर्टिगा गाडी जळून खाक

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथे एक एर्टिगा कार जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इर्टिगा कार (एमएच-46, बीए-5471) कोकणातून मुंबईकडे जात होती. ही गाडी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पेण जवळील हमरापूर येथील पुलावर गाडी आली असता अचानक आग लागली.  आग लागल्याचे लक्षात येताच चालक शंकर जाधव हे घाबरून गाडीतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेचे वृत्त समजताच पेण नगर परिषदेच्या अग्निशमन  दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले. या आगीमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply