Breaking News

तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?

फडणवीसांचा सवाल

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 21) महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. या वेळी फडणवीस यांनी पवारांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांवरदेखील टिप्पणी केली.
फडणवीस म्हणाले की, आज शरद पवार यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला थोडे आश्चर्यदेखील वाटले, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत. त्यामुळे निर्मात्यांना आपले सरकार कसेही वागले तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. त्यांनी ज्या वेळी हे सांगितले की वाझे यांना परमबीर सिंह यांनी घेतले, हे खरेच आहे. सिंह यांची समिती त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोकं होते. त्यांनी निर्णय घेत वाझेंना परत घेतले. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्त्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय राज्य सरकार झोपले होते का? सरकारला माहिती नव्हते? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का?
एखादा निलंबित असलेला व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतले, तर त्याला महत्त्वाचे अधिकारीपद देता येत नाही. एवढेच नाही तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस त्यांच्याचकडे देण्यात आल्या. हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झाले का? माझे स्पष्ट मत असे आहे, होय, शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे. हे खरेच आहे की, परमबीर सिंह यांच्याच समितीने वाझे यांचे निलंबन रद्द करून त्यांना पदावर घेतले, पण त्याचे पुढचे वाक्य ते विसरले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने व निर्देशाने हे काम परमबीर सिंह यांनी केले आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा इतक्या महत्त्वाच्या पदावर गेला आणि नंतर त्यांनी काय केले हे आपण सर्वांनी पाहिले आहे.
…तर आज ही वेळ आली नसती
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली झाल्याने त्यांनी हा आरोप लावला, पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असे वाटते की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती, असे या वेळी फडणवीस यांनी नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply