Breaking News

एसटीचा संप चौथ्या दिवशीही कायम

रोहे ः प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असून, त्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन  एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष शंशाक राव यांनी रोहा येथे केले. एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारचा कर्मचारी घोषित करावे, वेतन निश्चीती करावी, थकबाकी तातडीने द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू आहे. एसटीच्या रोहा आगारातील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांना शंशाक राव मार्गदर्शन करीत होते. आंदोलनकर्त्यांना निलंबनाच्या नोटीसी द्यायला सुरूवात केली आहे. त्याला  उत्तर देण्याचे काम युनियन करेल, कर्मचार्‍यांनी घाबरू नये, असे शंशाक राव यांनी या वेळी सांगितले. या वेळी सुरेंद्र येरूणकर, जितेंद्र गायकवाड, विवेक माने, संदिप गायकवाड, आशिष भावसार, हेमंत कदम यांच्यासह एसटी कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी चौथ्या दिवशीही रोह्यात एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरूच होता. या संपात रोहा एसटी आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांनी  आगाराबाहेर आंदोलन सुरू ठेवले असून, एसटी बंद असल्याने बस स्थानकात गेल्या चार दिवसांपासून शुकशुकाट आहे.

मुरूड : शासनामध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीवर एसटी कर्मचारी संघटना ठाम आहेत, मात्र राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे एसटी कर्मचार्‍याचा संप गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे  मुरूडमधील प्रवाशांचे हाल होत असून, खाजगी वाहतूकदारांची मात्र चांदी झाली आहे. आम्हाला राज्य सरकारी कर्मचार्‍याचा दर्जा देण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री अथवा परिवहनमंत्री देत नाहीत, तोपर्यंत हा संप  सुरु राहणार असल्याचे मुरुड आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी सांगितले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply