कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यांच्या आदिवासी भागाला जोडणार्या कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत इंटरनेट सुविधा मिळत नाहीत. या इंटरनेट घोळामुळे गेल्या महिनाभर वैतागलेल्या खातेदारांनी केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (दि. 28) महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे ठोकण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे येथील शाखेत गेले कित्येक दिवस इंटरनेट सुविधा नसल्याने बँकेचे व्यवहार बंद आहेत.कशेळे परिसरातील पन्नास गावांचा व्यवहार या बँकेवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील लोकांचे कशेळे हे बाजारहाटीचे ठिकाण आहे. ते बँकेतून पैसे काढून लागणारे सामान खरेदी करीत असतात. मात्र बँक बंद असल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. बँकेत येण्यासाठी किमान पन्नास रुपये खर्च होतात मात्र बँकेत पैसे तर मिळतच नाहीत, यामुळे लोकांचा जाण्यायेण्याचा वेळ फुकट जातो. सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी या संदर्भात वारंवार बँक अधिकार्यांशी चर्चा करून खातेदारांची समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र ‘उद्या कोणत्याही परिस्थितीत आम्ही इंटरनेट सुविधा सुरू करू‘, असे सांगून बँक अधिकारी खातेदारांची दिशाभूल करीत होते.
गुरुवारी कशेळे येथील आठवडा बाजारानिमित्त परिसरतील शेकडो लोक बँकेतून पैसे काढून बाजारहाट करण्यासाठी आले होते आणि नेहमीप्रमाणे इंटरनेट सुविधा बंद असल्याचे कारण देऊन त्यांनी लोकांना पैसे देण्यास नकार दिला. बँकेच्या अधिकार्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाहीत, म्हणून सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी मते, तसेच अरुण हरपुडे, व्यापारी संघटनेचे सचिन राणे, योगेश हरपुडे, भगवान मते, प्रकाश घोडविंदे, मंगेश सावंत, रामदास ठोंबरे, ललित गोर यांच्यासह अनेक ग्राहकांनी बँक मॅनेजर सौरभ माथूर यांना बँक कधी चालू होणार याचा जाब विचारला.
- 5गेले महिनाभर इंटरनेट सुविधा मिळत नाही, त्यामुळे खातेदार कंटाळले असून, त्यांच्या लोकभावनेचा आदर करून आम्ही बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-सौरभ माथूर, शाखाधिकारी,
बँक ऑफ महाराष्ट्र,
कशेळे शाखा.