- आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार
- तहसीलदार, आरोग्य अधिकार्यांसह पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
करंजाडे चिंचपाडा परिसरात नागरी आरोग्य केंद्र बांधून तयार असून, सिडको ते जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणार आहे, मात्र या प्रक्रियेला वर्षभराचा काल लोटला तरी हे उपकेंद्र धूळखात पडून होते, परंतु आता ते सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर आणि सिडको आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी शुक्रवारी (दि. 30) तेथे भेट देत सविस्तर माहिती घेतली असून, प्रतीक्षेत असणारे नागरी आरोग्य केंद्राचे दार लवकरच उघडणार आहे.
या वेळी करंजाडेचे सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर, राम पाटील, शशिकांत केणी, सचिन केणी, संजय परदेशी, विजय केणी यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
सिडकोने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात सिडको व जिल्हा परिषद अपयशी ठरली आहे. करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना याचा सतत अनुभव येत आहे. खासगी दवाखान्यांत महागडे उपचार घेताना नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. सिडकोने सुरुवातीलाच येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय करणे अपेक्षित होते, मात्र या सुविधेकडे दुर्लक्ष केले गेले. आता कोरोना संकटात आरोग्यसेवेची निकड अधिक भासू लागली आहे. अनेक खासगी रुग्णालयांत सर्दी, खोकला आणि साधा ताप असला तरी उपचार दिले जात नाहीत. सर्वच रुग्णांकडे कोरोनाच्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे करंजाडे परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात उपचार घेणे अनेकांना परवडणारे नाही. विशेषकरून अल्प उत्पादन गटातील रहिवाशांना महागडे औषधोपचार घेता येत नाही. त्याचबरोबर कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाबाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे, तर दुसरीकडे करंजाडे परिसरातील सिडकोने बांधकाम केलेले प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सध्या स्थितीत बंद अवस्थेत आहे.
या विषयाकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार त्यांनी तहसीलदार विजय तळेकर, सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस बाविस्कर यांच्यासह आरोग्य केंद्राला भेट दिली. हे उपकेंद्र सुरू करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. त्यामुळे येथील नागरी आरोग्य केंद्राचे दार लवकरच उघडणार आहे.
खासगी डॉक्टरांचे पथक नेमणार
गेल्या एक वर्षांपासून सिडकोने बांधकाम केलेले नागरी आरोग्य केंद्र धूळखात पडून आहे. सिडको हे उपकेंद्र जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित ज्या वेळेला करील तेव्हा हस्तांतरण होईल, मात्र सद्यस्थितीत या परिसरातील नागरिकांनी तपासणी केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांना उपचार घेण्याकरिता धावपळ करावी लागत आहे. त्या दृष्टीने धूळखात पडलेले आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर म्हणून सुरू करावे, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आरोग्य अधिकारी बाविस्कर यांना केली. त्यावर बाविस्कर यांनी येथे कोविड सेंटर सुरू करण्यास काही हरकत नाही, मात्र याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करावा लागेल, असे सांगितले, तसेच त्यानुसार खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाच्या नियुक्तीचासुद्धा विचार करू, असे म्हटले.
बंद अस्वस्थेत असलेले करंजाडे येथील नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत येथील नागरिकांनी भेट घेत माहिती घेतली. हे धूळखात पडून असलेले केंद्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर म्हणून सुरू करण्याकरिता खाजगी डॉक्टरांचे पथक किंवा सिडकोच्या माध्यमातूनच सुरू करावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्र सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांना येथे उपचार घेता येईल.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल