Breaking News

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना फटका

मासळीची आवक घटल्याने नौका किनार्‍यालाच

उरण : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या उरण तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळे, खराब हवामान, अतिवृष्टी यांमुळे आधीच कोलमडलेला मच्छीमारी व्यवसाय आता कुठे उभारी घेत होता. त्यात आता पुन्हा बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.

1 ऑगस्टला मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून सतत खराब हवामान आणि वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे समुद्रात मासे अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे. या मिळणार्‍या मासळीच्या विक्रीतून मच्छीमारीसाठी जाणार्‍या बोटींचा डिझेल आणि इतर खर्चदेखील निघत नसल्याने शेकडो मच्छीमारी बोटी किनार्‍यावर लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथिल मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी बाजारातदेखील मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील

तीन-चार दिवसांपासून मच्छीविक्रेत्यांच्या टोपल्या रिकाम्या दिसत आहेत. ससून डॉक, कुलाबा,भाऊचा धक्का या ठिकाणी मासळी बाजारात मासळीचा तुटवडा जाणवू लागला आहे.

उरण तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यात करंजा, मोरा, दिघोडे, खोपटे, आवरे, गोवठणे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी समु्द्रकिनार्‍यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय केला जातो. एकट्या करंजा गावात सुमारे 1100 यांत्रिक नौका असून हजारो कुटूंबाचा उदर निर्वाह या व्यवसायावर चालतो, मात्र यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मच्छीमारीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून मच्छिमारी न करताच परतावे लागले आहे.

याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. ट्रॉलर किंवा पर्सोनेट नौकेला मच्छिमारीला जातांना साधारणपणे दोन लाख रुपये खर्च येतो. डिझेल, बर्फ, खलाशांची मजूरी आणि त्यांचा जेवण-खाण्याचा खर्च अशा प्रकारचा साधारण खर्च असतो, मात्र मच्छीमारीचा हंगाम सूरू झाल्यापासून मच्छिमारांच्या नौका वादळ आणि खराब हवामान यामुळे अनेक वेळा परत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा झालेला खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे सध्या प्रत्येक नौका मालकांवर 10 ते 12 लाखाचे कर्ज झाले आहे.

व्यवसायावरील आधारित घटकही अडचणीत

वातावरणातील बदलामुळे मच्छीमार अडचणीत सापडजा आहे. त्यामुळे मच्छीमार व्यवसायावर आधारीत खलाशी, मच्छीविक्रेते, टेम्पोचालक, जाळी व साहित्य विक्री करणारांचे व्यवसायदेखील अडचणीत आले आहेत.

उरण तालुक्यात मच्छिमारांसाठी लॅण्डींग पॉईंट चांगला असल्यामुळे आणि मुंबईसारखी बाजारपेठजवळ असल्यामुळे व्यवसाय चांगला फोफावला आहे, मात्र गेल्या वर्षीपासून सतत येणारी वादळे आणि खराब हवामान यामुळे मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. मासेमारीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. नफा सोडून द्या पण खर्च पण निघत नसल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किनार्‍याला लावल्या आहेत. मच्छीमार सध्या अडचणीत आला आहे. राज्य शासनाने त्याला आर्थिक अडचणीत बाहेर करण्यासाठी आर्थिक मदत करावी.

-भालचंद्र कोळी, चेअरमन, करंजा मच्छिमार सोसायटी

ढगाळ वातावरणामुळे समुद्रात मासळी मिळत नाही. त्यातच समुद्रात वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे मासळी स्थलांतरीत होते. परिणामी ठरलेल्या ठिकाणी मासळी मिळत नाही.

-अरूण वशेणीकर, मच्छीमार, नौका तांडेल

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply