नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. 29) रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी या मेळाव्याचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास उदंड प्रतिसाद लाभला.
कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी तयार करणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि कंपनी प्रतिनिधींशी थेट संवाद साधता येणे हे होते.
या रोजगार मेळाव्याला मुंबई येथील नामांकित कंपन्या जिओ, हेक्झावेअर, एच.डी.एफ.सी. आदींचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आले होते. मेळाव्यात पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच दिवशी त्यांची निवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मुंबई येथील बॅकींग, वित्त, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नामांकित 26 कंपन्यांनी उपस्थिती दर्शविली होती. या मेळाव्यासाठी कला विभागाचे 65, वाणिज्य विभागाचे 276 आणि विज्ञान विभागाचे 196 असे एकूण 537 विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक़, प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, प्लेसमेंट विभागाचे समन्वयक डॉ. राजेश येवलेे, विज्ञान विभागाचे सह समन्वयक व्ही. एस. कांबळे आणि वाणिज्य विभागाच्या सहसमन्वयिका तृप्ती जोशी यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केलेे.