Breaking News

खारघरमधील गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी

भाजपतर्फे सिडकोकडे पाठपुरावा

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर परिसरात अनेक ठिकाणी गटारे खुली आहेत. तर काहींची झाकणे गायब झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. खुल्या गटारात पडून एखादा अपघात होऊ शकतो. सिडकोने याची दखल घेऊन गटारांवर सर्व झाकणे बसवावीत, अशी मागणी भाजपकडून होत आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. या संदर्भात सिडकोकडून कार्यवाही झाली नसल्याने या गटारांवर झाकणे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तळोजा गाव, फर्शीपाडा आणि पापडीचा पाडा या गावात मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. त्यामुळे या तीनही गावातील मुले खारघर सेक्टर 34 लगत असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्यावर खेळतात, मात्र मोकळ्या रस्त्याचा कडेला गटारे खुली असल्यामुळे मुले किरकोळ जखमी झाल्याचे प्रकार घडले आहे. परिसरात क्रिकेट खेळणार्‍या मुलांकडे विचारणा केली असता, सिडकोने दोन वर्षांपूर्वी सेक्टर 34 मधील रस्त्याचे डांबरीकरण करताना गटारावर झाकणे बसविली होती, मात्र काही ठिकाणी गटारावरील झाकणे तुटली आहेत. तर काही ठिकाणची झाकणे काढून दुसरीकडे वापरली जात आहेत. सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत सिडकोच्या खारघर कार्यालयात विचारणा केली असता, मोडकळीस आलेली गटारे दुरुस्ती केली जातील, असे सांगण्यात आले.

इतर समस्यांमुळेही नागरिकांची गैरसोय

खारघरमधील उद्यानांतील खेळणीही तुटली असून त्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता आहे. सुनियोजित शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खारघर शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सिडकोने या समस्यांकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply